Uddhav Thackeray: 'महाराष्ट्र बंद करू...'! उद्धव ठाकरेंकडून राज्यपाल कोश्यारींचा 'सॅम्पल' म्हणून उल्लेख, महाराष्ट्र प्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:32 IST2022-11-24T17:30:45+5:302022-11-24T17:32:57+5:30
Uddhav Thackeray on Bhagatsingh Koshyari: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे. ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमले जातेय का? असा सवाल ठाकरेंनी केंद्र सरकारला केला.

Uddhav Thackeray: 'महाराष्ट्र बंद करू...'! उद्धव ठाकरेंकडून राज्यपाल कोश्यारींचा 'सॅम्पल' म्हणून उल्लेख, महाराष्ट्र प्रेमींना एकत्र येण्याचे आवाहन
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रेमींनी दोन दिवसांत एकत्र यावे. सर्वांकडून गुळमुळीच प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. भाजपाकडून मिळमिळीत प्रतिक्रिया येत आहेत. कुणीही टपलीत मारावे असे राजकारण सुरु असल्याचे म्हणत वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमले जातेय का? असा सवाल ठाकरेंनी केंद्र सरकारला केला. राज्यपाल हे निपक्षपाती असावेत, राज्यात काही पेच झाला तर तो केंद्रात सोडवावे अशी भूमिका असायला हवी, परंतू ते तसे वागत नाहीएत. महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केला जातोय, असे ठाकरे म्हणाले.
शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची यांची हिंमत झाली. कोश्यारींनी आधी ठाणे, मुंबईच्या मराठी माणसांचा अपमान केला होता. सावित्रीबाईंबाबतही असेच बोलले होते, तेव्हा आपण जाऊदे होते कधी कधी असे म्हणून सोडून दिले होते. आता महाराजांचा अपमान केलाय, सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे हे पाहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच राज्यपालांना राज्यपाल बोलण्याचे मी सोडले आहे. या 'सॅम्पल'ला आता वृद्धाश्रमात पाठविण्याची वेळ आली आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र यावे. महाराष्ट्र बंदचे पुढे बघू, असे ते म्हणाले. ईडी सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही माहित नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाहीत. ते पंतप्रधानांना मी सांगितलेय असे म्हणतात, ते काही करू शकत नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.
संभाजी राजे बोलत आहेत, उदयनराजे बोलत आहेत, आता वेळ आसली आहे या राज्यपालांना घालविण्य़ाची. महाराष्ट्र द्रोह्याला इंगा दाखविलाच पाहिजे. मी पक्ष बाजुला ठेवून आवाहन करतोय, भाजपाचे लोक असतील तरी त्यांनी यावे, केंद्राला सुद्धा सांगतोय चाळे बास झाले, या सॅम्पलला परत घेऊन जा, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे. स्लीप ऑफ टंग एकदा होईल, सारखी सारखी होऊ शकत नाही. नाहीतर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवतील याचा नेम नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.