Uddhav Thackeray : "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:20 IST2023-12-01T16:08:43+5:302023-12-01T16:20:11+5:30
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray : "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या"
उद्धव ठाकरे यांनी आज शेतकरी मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. "पंचनाम्याचा खेळ थांबवा, सरसकट मदत द्या" असं म्हणत टीकास्त्र सोडलं. तसेच "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"या सरकारने सगळंच विकायला काढलंय, तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका! बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या! दुःखात खचून जाऊ नका, शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे" असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं आहे.
"प्रधानमंत्री फसल योजना हा घोटाळा आहे, पारदर्शकता असेल तर विम्याचे पैसे गेले कुठे? पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या! माझ्या बळीराजाला न्याय द्या. जबाबदारी घेतली आहेत, तर जबाबदारी पार पाडा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा" असं देखील ठाकरेंनी म्हटलं आहे.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतलेली पत्रकार परिषद! pic.twitter.com/pgFPrsY3Oh
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 1, 2023
"मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"
उद्धव ठाकरे यांनी याआधी राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता. तसेच "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे, मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार?" असा सवालही विचारला होता.
"दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत?, भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा! आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा! मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांना दिलासा द्या!" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.