"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 08:05 AM2023-05-22T08:05:59+5:302023-05-22T08:14:28+5:30

Uddhav Thackeray Slams Narendra Modi : सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Modi Government Over 2000 in saamana editorial | "देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

"देशाची अर्थव्यवस्था खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदींनी बांधलेला दिसतोय"; सामनातून घणाघात

googlenewsNext

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. "देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय" असं म्हणत निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱयांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नसल्याचंही म्हटलं आहे. 

"मोदींचे अंध भक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल. एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंध भक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे. असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंध भक्तच करू शकतात" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. 50 खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच" असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे. 

सामनाचा आजचा अग्रलेख 

- भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नोटाबंदीचा खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दाबला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. 

- मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱया दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही. उलट लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले. नोकऱया गेल्या. काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल असा त्यांचा दावा होता. 

- मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत, तेथे ‘भारताची रिझर्व्ह बँक’ दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? 

- दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱयांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो. दोन हजारांची नोटाबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे. देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे. 

- मोदी यांचे अंध भक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल. एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंध भक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे. असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंध भक्तच करू शकतात. दोन हजारांची नोट चालू करून मोदी हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत. 

- देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय. मोदी अर्थव्यवस्थेशी निर्घृणपणे खेळत आहेत, हे गौतम अदानी प्रकरणातही दिसले. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम मोदींनी अदानी यांच्या खिशात टाकले. सार्वजनिक बँकांचा, एलआयसीसारख्या उपक्रमांचा पैसाही त्यांनी अदानींसारख्या मित्रांना दिला. आपण राष्ट्रीय संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत याचा विसर त्यांना पडला आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Modi Government Over 2000 in saamana editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.