Uddhav Thackeray Speech: मी तुमच्यासोबत यायला तयार, पण...; दुपारी शिंदे गटाची साद, त्याला उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:06 PM2022-09-21T23:06:48+5:302022-09-21T23:07:14+5:30
सूरत २३२ किमीची पाटी पाहिली. बापरे किती लांब जावे लागले यांना, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय, असेही ते म्हणाले.
दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जुंपली असून कोण मेळावा घेणार, कोण गद्दार यावरून वाद पेटला आहे. अशातच गुवाहाटीला गेल्यापासून शिंदे गट उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासोबत या असे सांगत आला आहे. आजही शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना एका अटीवर उद्धव ठाकरेंचे स्वागत करू, अशी ऑफर दिली आहे. या ऑफरला ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला आहे, पण त्यांनीही एक अट टाकली आहे.
शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची स्पष्ट भूमिका मांडावी. असे झाले तर शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे यांचेच विचार प्रकट होतील, हा संदेश शिवसैनिकांमध्ये जाईल. या भूमिकेचे आम्हीही स्वागत करू, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.
यावर आज झालेल्या गटप्रमुखांच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मी तुमच्यासोबत यायला तयार असल्याचे म्हटले आहे. वेदांत गेला, हे धादांत खोटे बोलतायत. आमच्यामुळे गेला की तुमच्यामुळे यावर बोलत बसण्यापेक्षा सत्तेत असलेले आणि विरोधक एकत्र येऊ आणि वेदांताला पुन्हा महाराष्ट्रात आणू, असे का नाही बोलत. असे झाले तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज मोदी सरकारने सेमिकंडक्टरसाठी आणखी सवलती दिल्या, म्हणजे वेदांता गुजरातला जाण्याच्या आधीच ठरलेले होते असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.
सूरत २३२ किमीची पाटी पाहिली. बापरे किती लांब जावे लागले यांना, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईवर गिधाडे फिरू लागलीत. मुंबई गिळायचीय, लचका तोडायला देणार का? आजचे नवीन नाहीय. शिवाजी महाराजांपासूनच्या काळापासून सुरु आहे, असे ठाकरे म्हणाले. आज एवढी गर्दी आहे, मग दसरा मेळाव्याला किती असेल? शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुढच्या आढवड्यात मुंबईत पंतप्रधान येत आहेत. लढाई लक्षात घ्या. सगळे शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. आम्हीही त्याचीच वाट पाहतोय. अमित शहांना आव्हान, मुंबई महापालिका निवडणूक महिनाभरात घेऊन दाखवा, त्याहून हिंमत असेल तर महाराष्ट्रचीही निवडणूक लावून दाखवा, असेही त्यांनी भाजपाला आव्हान दिले.