Uddhav Thackeray : ‘गाडीवर उभं राहण्याची कॅापी करून होत नसतं, बाळासाहेबांनी...’ भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:08 PM2023-02-18T16:08:08+5:302023-02-18T16:08:46+5:30
शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी ओपन कारमधून संबोधित केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण आणि पक्षाचं ‘शिवसेना’ हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगानं यासंदर्भातील निर्णय दिला. भारतीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले. सकाळपासूनच मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यांना संबोधित करण्यासाठी उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह बाहेर आले आणि ओपन कारमधून भाषण केलं. यावेळी शिवधनुष्य चोरीला गेलंय. निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिला. दरम्यान, यानंतर भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून जोरदार टोला लगावला.
“गाडीवर उभं राहण्याची कॉपी करुन होत नसतं. बाळासाहेबांनी दिवसरात्र मेहनत केली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिक बसवला; पण कॉपीबहाद्दर कधी घराच्या बाहेर पडले नाहीत. कार्यकर्त्यांना भेटले नाहीत, उभी संघटना गमावली, विश्वासघातानं स्वत:च सत्तेवर बसले,” असं म्हणत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
गाडीवर उभ राहण्याची कॅापी करून होत नसत.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 18, 2023
बाळासाहेबांनी
◾️दिवसरात्र मेहनत घेतली,
◾️कार्यकर्ता जपला,
◾️संघटना उभी केली.
◾️सत्तेवर शिवसैनिक बसवला.
कॅापीबहीद्दर
◾️कधी घराच्या बाहेर पडले नाहीत.
◾️कार्यकर्ता भेटले नाहीत
◾️उभी संघटना गमावली
◾️विश्वासघाताने स्वःताच सत्तेवर बसले pic.twitter.com/H5kob3OOxG
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू,” असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.