"उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट मुस्लिम समाजामुळे वाढला"; प्रकाश आंबेडकरांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:36 PM2024-08-05T12:36:30+5:302024-08-05T12:36:43+5:30
खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
Prakash Ambedkar on Shiv Sena : शिवसेना पक्ष कुणाचा या वादावरुन गेल्या अडीच वर्षापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये दावे प्रतिदावे केला जात आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख आणि नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या यशावरुन प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं.
खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा मुस्लिम समाजामुळे वाढल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील स्ट्राईक बघितला तर शिंदेचा स्ट्राईक रेट डबल आहे. शिवसेनेची मते ही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसैनिक खरी शिवसेना मानत आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षण आणि मुस्लिम समाजामुळे वाढला आहे," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. पण त्यांची प्रज्ञा नेहमी नेहमी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या हरवलेली असते. ती अशीच हरवते म्हणून प्रकाश आंबेडकर कायमचे राजकारणात वंचित राहिले आहेत. दुसऱ्याच्या पायात खोडा घालणं एवढंच त्यांचे काम आहे. स्वतः एकही जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे याबाबत आश्चर्य आहे. कदाचित त्यांचे डोळे उघडले तर महाराष्ट्राच्या विकासासाठी हातात हात देऊन पुढे जाणे, क्षणभर थोडं मागे राहणे आणि अट्टाहास न करणे, त्याग करणे ही मूलभूत तत्वे त्यांनी स्विकारली तर खूप काही घडू शकतं," असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.
राज ठाकरेंवर टाडा लावला पाहिजे - प्रकाश आंबेडकर
"महाराष्ट्रातील माणूस हा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राहतो. मध्यप्रदेश गुजरात मध्येही राहतो. त्यांचं काय करायचं? त्यामुळे राज ठाकरे यांचे वक्तव्य समाज दुभंगण्याचे वक्तव्य आहे. समाज दुभंगला की देश दुभंगतो. त्यामुळे यांना युएपीए आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा ताबडतोब लागला पाहिजे. अशा व्यक्तींना सरळसरळ टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न बघता अशांना आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे. त्यामुळे ही हिम्मत सरकारने दाखवावी," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.