उद्धव ठाकरेंचा CM एकनाथ शिंदेंच्या गडाला हादरा; मातोश्रीतून सरकारवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 02:52 PM2023-11-25T14:52:53+5:302023-11-25T14:53:47+5:30
जनतेला काय पाहिजे हे राज्य सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज कसा पोहचवायचा हे शिवसैनिकांना चांगले कळते असं त्यांनी म्हटलं.
मुंबई - आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे, पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. आज मातोश्री इथं २५० पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात सहभागी झाले.या पक्षप्रवेशानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी शिंदेंचा गड मानला जाणाऱ्या ठाणे, पालघरमध्ये सत्ताधारी पक्षाला खिंडार पाडले आहे.यावेळी लढणारे सैन्य माझ्यासोबत असल्याने राजकारणातील गद्दारांना गाडायला मला वेळ लागणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जास्त बोलत नाही. बोललो तर भाषण करावे लागेल. पालघर, ठाण्यातील लोकांनी पक्षात प्रवेश केला. असे दृश्य फार दुर्मिळ आहे.कारण सत्ताधारी पक्षाकडे लोक जात असतात. आज आपल्याकडे लोक येतात. या देशात नव्हे जगात हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे.आता ही उपाधीही चोरायला बघतायेत.या लोकांना राजकारणात गाडण्यासाठी तुम्ही सगळे सोबत येताय.आई एकविरेचे छत्र आपल्या डोक्यावर आहे. मला खात्री आहे आपण जिंकणार आहोत.माझे पालघर भागाकडे दुर्लक्ष झाले हे मला मान्य करावं लागेल. पोटनिवडणूक लढलो त्यानंतर लोकसभा झाली ती जिंकलो. येणाऱ्या निवडणुकीत भगवा झेंडा कायम ठेवायचा आहे. लवकरात लवकर मी पालघर मतदारसंघातील गाठीभेटींचा दौरा करणार आहे. जनतेला काय पाहिजे हे राज्य सरकारला कळत नसेल तर जनतेचा आवाज कसा पोहचवायचा हे शिवसैनिकांना चांगले कळते असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत आज देशात जे वातावरण आहे मी त्याबाबत जाहीर सभेत बोलेनच. पण मी व्यक्तीविरोधात नाही तर वृत्तीविरोधात आहेत. आता सुरु असलेली हुकुमशाही मोडून काढता आली नाही तर पुन्हा आपल्याला डोकं वर काढता येणार नाही. सर्वसामान्य माणसाला गुलाम म्हणून वागावे लागेल. ही गुलामगिरी मला मान्य नाही. मी सर्वसामान्यांना गुलाम होऊ देणार नाही म्हणून मी लढायला उतरलो आहे. पण लवकर पालघरमध्ये तुम्ही ठरवा, वेळ ठिकाण तिथे सभेला येतो आणि तिथे तुमच्याशी बोलतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दिवा उपशहर प्रमुख भाजपा ज्योती पाटील,पालघरमधील हरिशचंद्र कोलाड यांच्यासह शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.