मी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 03:56 PM2023-06-24T15:56:41+5:302023-06-24T15:58:01+5:30
आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही परंतु तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई - पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीतील एका फोटोमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी आणि ठाकरे गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. आजपर्यंत ज्या मेहबुबा मुफ्तीवरून उद्धव ठाकरेभाजपावर टीका करत होते. त्याच मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसल्याचे पाहून भाजपाने पलटवार केला. मात्र आज मुंबईत झालेल्या शिवसैनिकांच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो होतो असं विधान केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, काल मी विरोधकांच्या बैठकीत मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम जाऊन बसलो. कारण त्या भाजपाच्या लॉन्ड्रीतून त्या स्वच्छ झाल्यात. त्यांच्या बाजूला बसलो तर आणखी आजूबाजूचे स्वच्छ होतील. तुमच्यासोबत गेलात तर तो स्वच्छ.. काल फडणवीस बेबींच्या देठापासून ओरडत होते. आम्ही प्रश्न विचारले तर मिरच्या का झोंबल्या? आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करता मेहबुबा मुफ्तीसोबत तुम्ही सरकारमध्ये होता तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं होतं का? असा सवाल त्यांनी केला.
तसेच आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही परंतु तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. काल मी मेहबुबा मुफ्तींना बोललो, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले असा आमच्यावर आरोप होतो. त्या म्हणाल्या हो, मी ऐकलंय. मी त्यांना विचारलं तुम्ही का त्यांच्यासोबत गेलात तर भाजपाने कलम ३७० काढणार नाही असं वचन त्यांना दिले होते. त्यानंतर सत्ता स्थापन केली. भेटल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका
पाटण्यात झालेली बैठक ही विरोधकांची नसून परिवारवादी बैठक होती. कुटुंब वाचविण्यासाठी सारे एकत्र आले आहेत. आता मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारच्या खुर्चीत बसणे उद्धव ठाकरेंना चालते का? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला होता.