...तर हिंमतीस दाद दिली असती; नरेंद्र मोदी-शरद पवारांवर उद्धव ठाकरेंचे खोचक बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:23 AM2023-08-01T09:23:56+5:302023-08-01T09:25:07+5:30
शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
मुंबई – नरेंद्र मोदी कालपर्यंत ज्यांना भ्रष्ट मानत होते, ते मोदींचा सन्मान करतील. याचा अर्थ मोदी आणि त्यांच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटेच आहेत. फक्त पक्ष फोडण्यासाठीच त्यांनी हे आरोप केले आणि लोकांमध्ये भय निर्माण केले. दुसरे आश्चर्य म्हणजे शरद पवार, महिन्यापूर्वी मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, पक्ष फोडला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून सोडला. तरीही शरद पवार मोदींचे आगत स्वागत करणार हे लोकांना आवडले नाही. शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती अशा शब्दात सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यावर खोचक बाण सोडले आहेत.
सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की, खरेतर, लोकांच्या मनात आपल्या विषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. तिनेक महिन्यापूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल असं पवार म्हणतात. पण पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांच्या या विशेष निमंत्रकाचा पक्ष फोडून भाजपामध्ये सामावून घेतला. त्याचा निषेध म्हणून शरद पवारांनी गैरहजर राहायला हवे होते असं त्यांनी सांगितले.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
शरद पवार मऱ्हाटे आहेत, शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असं ते स्वत:च सांगत असतात तेव्हा त्यांच्याकडून वेगळ्याच आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे. देशातील हुकुमशाहीविरोधात इंडिया आक्रमक आघाडी तयार झालीय. शरद पवार हे त्या आघाडीतले महत्त्वाचे शिलेदार आहेत.
मोदी पुण्यात असताना तिकडे संसदेत दिल्ली सरकारचे लोकशाही अधिकार खतम करून सर्वोच्च न्यायालयाचा न्याय तुडवत विधिमंडळाच्या अधिकारावर आक्रमण करणारे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणले जात आहे. हे हुकुमशाही विधेयक आणणारे मोदी हे स्वातंत्र्याचे सेनानी लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार घेतील व शरद पवार संसदेत विधेयकास विरोध करण्यास हजर राहण्याऐवजी मोदींना पुरस्कार देतील हे पवारांच्या चाहत्यांना आवडणार नाही.
देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. मोदी ३ महिन्यापासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर आणि अराजकावर काहीच बोलायला तयार नाहीत.
मणिपुरात आदिवासी महिलेची नग्न धिंड काढली गेली तरीही पंतप्रधान मौनात आहेत. देशाच्या नायकाने संकटकाळी मौनात जाणे राष्ट्रहिताचे नाही. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यात ९३ वर्षीय बाबा आढाव यांच्या नेतृत्वात इंडिया फ्रंटच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होतील अशी विचित्र परिस्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. नेते नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर व कार्यकर्ते हाती काळे झेंडे घेऊन रस्त्यावर मोदींविरोधात, देवा दगडूशेठ गणराया, तूच हे त्रांगडे सोडव रे बाबा. पण त्याआधी महान स्वातंत्र्यसेनानी, गुलामीविरुद्ध स्वराज्याचा मंत्र देणाऱ्या लोकमान्य टिळकांना मानाचे अभिवादन.