"शिवसेना या आईवर वार केलाच ना.."; उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडणाऱ्यांना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:24 AM2023-07-26T08:24:38+5:302023-07-26T08:25:18+5:30
शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं.
मुंबई – बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या मेहनतीने जे देऊ शकत होतो ते दिले. बरेच लोक बाहेरून आले तसे गेले असं नाही. ते तसे आले-गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा राजकारणातला जन्मच शिवसेनेत झाला. त्यांनीसुद्धा शिवसेना आईवर वार केलाच ना अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आजही काही असंख्य लोक आहेत ज्यांना दिल्यानंतरही ते गेलेले नाहीत. ते माझ्यासोबत आहेत. या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख, कैलास पाटील येऊन गेले. बाकी असे अनेक आहेत. मुंबईचे रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील प्रभू किती जणांची नावे घ्यायची, मुंबईबाहेरच सुद्धा अनेक आहेत. शिवसेना कुणाची हा लोकांचा प्रश्न नाहीच. कारण लोकांनी ठरवलेले आहे जिथे शिवसेनाप्रमुख आणि ठाकरे आहेत तीच खरी शिवसेना असं त्यांनी म्हटलं.
तसेच मी माझ्या हिंदुत्वाची चौकट जी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेली आहे. ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशावर प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे नाही. हे काही कर्मकांड वैगेरे यावर ठेवणारे आमचे हिंदुत्व नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
...तर न्यायालयाचे दरवाजे उघडे
शिवसेनेची जी काही मागणी आहे ती संविधानाच्या तरतुदींना धरूनच आहे. या तरतुदी पुसता येणार नाहीत. मग तुम्हाला संविधान बदलावे लागेल. घटना बदलावी लागेल. पात्र-अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. ज्याप्रमाणे शिवसेना कुणाची यासाठी आम्ही न्यायालयात गेलो तिथे न्यायालयाने निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे त्यामुळे हे ठरवण्याचा अधिकार आयोगाचा आहे. आधी त्यांच्याकडे जा, तिथे तुम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्याकडे परत या. निवडणूक आयोगाच्याविरुद्ध आपण न्यायालयात गेलो आहोत. तसेच विधानसभा अध्यक्षांनी घटनेला धरून न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं सांगत उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदार अपात्र ठरवले नाहीत तर न्यायालयात जाण्याचे सूचक विधान केले आहे.
लोकशाही साधा माणूस वाचवणार
हा देश प्रत्येकाचा आहे. त्यानेच आता धैर्याने उभं राहायला हवं. हे सरकार कुणाचे आहे तर हे सरकार माझे आहे. त्या सामान्य माणसाचे आहे. त्या सामान्य माणसाच्या मतांवर हे सरकार निवडून आले आहे. त्या सामान्य माणसाने आता विचार करून मत दिले पाहिजे. कारण तो नुसते मत देत नाही तर तो त्याचं आयुष्य यांच्या हातात देतोय. नुसतं आयुष्य नाही तर पुढच्या पिढीचं भविष्य यांच्या हातात देतोय. कारण यांना सत्तेत दहा वर्ष झाली म्हणजे एक पिढी पुढे सरकली. या पुढच्या पिढीसाठी जनतेने आताच शहाणे व्हायला पाहिजे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले.