उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच महाराष्ट्रातील राजकारण बिघडले, विनोद तावडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:08 PM2024-11-12T14:08:36+5:302024-11-12T14:09:16+5:30

महायुती सत्तेवर येण्याचा विश्वास

Uddhav Thackeray treachery has ruined politics in Maharashtra, Vinod Tawde alleges | उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच महाराष्ट्रातील राजकारण बिघडले, विनोद तावडे यांचा आरोप

उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळेच महाराष्ट्रातील राजकारण बिघडले, विनोद तावडे यांचा आरोप

कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारण फारच बिघडले आहे. २०१९ साली जनतेने भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांना कौल न स्वीकारता उद्धव ठाकरे यांनी जनतेशी गद्दारी केली. त्यामुळेच हे वातावरण बिघडल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकाेडे उपस्थित होते.

तावडे म्हणाले, व्यंगापासून ते प्राण्यांचा उल्लेख करत ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे, हे सर्वपक्षीयांनी थांबवायला हवे. मी विरोधी पक्षनेता होताे. परंतु सभागृहात खडाजंगी झाली तरी आम्ही सत्तारूढांसोबत जेवतही होताे. वैयक्तिक दुश्मनी नव्हती. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आणि मग वातावरण बिघडत गेले. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राममंदिराला विरोध करणाऱ्या कॉंग्रेससोबत गेल्याचे न पटल्याने एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांना आम्ही फक्त साथ दिली.

ते म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी थेट लढत झाली. त्यामध्ये काहीअंशी महायुतीला फटका बसला. परंतु विधानसभेला एमआयएम, वंचित, समाजवादी पक्ष, अपक्ष बंडखोर यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन अटळ आहे. हरयाणातील भाजपच्या विजयाने देशभरात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये आम्ही सहज सत्तेवर येऊ.

२०१४ ला राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच होता

केवळ बहुमतापेक्षा चारच आमदार जास्त असताना कोणतेही धाडसी निर्णय घेता येत नव्हते. त्यासाठी मजबूत सरकारची गरज असते. म्हणून अजित पवार यांची साथ स्वीकारली. परंतु चौकशीत समझोता केला नाही. परंतु २०१४ साली जेव्हा युती निवडून आल्यानंतरही उद्धव ठाकरे सरकार बनवायला तयार नव्हते तेव्हा शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता आणि आम्ही तो घेतला होता. त्यामुळे अजित पवार सोबत येणे यात वेगळे काही घडले नाही, असेही तावडे यांनी सांगितले.

Web Title: Uddhav Thackeray treachery has ruined politics in Maharashtra, Vinod Tawde alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.