मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

By admin | Published: March 11, 2016 08:19 AM2016-03-11T08:19:57+5:302016-03-11T08:19:57+5:30

ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे

Uddhav Thackeray used to say that the Mallya could run away from him | मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ -  ललित मोदी पळून गेला म्हणून ज्यांनी कंठशोष केला त्यांना आता मल्ल्या कसा पळून गेला, याचा जाब द्यावाच लागेल अशी खरमरीत टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवाद आणि राष्ट्रद्रोहच आहे. नऊ हजार कोटी हा जनतेच्या घामाचा पैसा होता. त्याची अशी विल्हेवाट लावणारे ‘आर्थिक’ दहशतवादीच आहेत असंदेखील ते बोलले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या देश सोडून लंडनला गेल्याप्रकरणी एकीकडे विरोधक सरकारला धारेवर धरत असताना मित्रपक्ष शिवसेनादेखील सरकारला जाब विचारत आहे. 
 
दाऊदला हिंदुस्थानात आणावे यासाठी सरकार पाकिस्तानकडे याचना करीत आहे, पण त्याच सरकारच्या डोळ्यासमोर व्हाईट कॉलर आर्थिक दहशतवादी पळून गेले. मल्ल्या पळून जाणार हे या देशातील शेंबडे पोरही सांगू शकत होते, पण सरकारला ते समजले नाही याचे आश्‍चर्य वाटते. मल्ल्याच्या श्रीमंती पार्टीतली झिंग सगळ्यांच्याच नसांत सळसळते आहे. ती उतरल्यावरच बोलावे लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
मल्ल्या पळून गेले ही अफवा किंवा कुजबूज नाही, तर केंद्र सरकारने छाती पुढे काढून अत्यंत गर्वाने व अभिमानाने ही माहिती सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवली आहे! देशातील बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून, सरकारी तिजोरीला चुना लावून एक उद्योगपती पळून जातोच कसा? हा प्रश्‍न आता सरकारला कोणी विचारू नये. कर्ज देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम यूपीए सरकारच्या काळात झाला, पण कर्ज बुडवून पळून जाण्याचा उपक्रम एनडीए सरकारच्या काळात पार पडला. हे भयंकर असल्याचं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
महाराष्ट्रातला शेतकरी कर्जवसुलीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतोय. त्याचे कर्ज पाच-पंचवीस हजारांचे असते, त्यासाठी घर, शेती त्याला तारण ठेवावी लागते. अस्मानी-सुलतानीमुळे कर्जाची परतफेड करणे त्याला शक्य झाले नाही तर कर्जवसुलीसाठी त्याच्या घर आणि शेतीवर जप्तीचा आदेश बजावला जातो. तेव्हा स्वाभिमानी शेतकरी हाय खातो व आत्महत्या करतो. त्याला मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवता येत नाही व पळूनही जाता येत नाही. गरीब माणूस किंवा शेतकरी पळून गेला तरी पोलीस त्याचा पाठलाग करतील आणि फरफटत आणून तुरुंगात टाकतील. पण मल्ल्या, ललित मोदींसाठी वेगळा कायदा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray used to say that the Mallya could run away from him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.