"यंत्रणांची दहशत माजवून 'चाणक्यगिरी' ही मर्दानगी नाही, हा कलंकच"; फडणवीसांवर 'सामना'तून बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:23 AM2023-07-12T10:23:04+5:302023-07-12T10:34:02+5:30
"या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर..."
Devendra Fadnavis vs Devendra Fadnavis: महाराष्ट्र दौऱ्यात शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख नागपूरला कलंक असा केला. त्यानंतर राजकारण पेटले. आधी फडणवीसांनी 'कलंकीचा काविळ' असे ट्विट करत ठाकरेंवर टीका केली. त्यानंतरही ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याची टीका फडणवीसांनी केली. या सर्व गोष्टींनंतर आता शिवसेना उबाठाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. "सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, ‘कलंक’ मतीचा झडो विषय सर्वथा नावडो, सदन्घ्री ‘कमळी’ दडो मुरडीता हटाने अडो, वियोग घडता रडो मन भव्त्चरित्री जडो," ही मोरोपंतांची केकावली देत आजच्या सामनातील अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील संस्कृती ‘कलंकित’ करण्याचा विडा काही लोकांनी स्वीकारला आहे. त्यांच्यासाठी मोरोपंतांच्या या ओळी मार्गदर्शक ठराव्यात. काही लोकांची मती कलंकित झाली आहे आणि त्यांची कलंकित मती हेच महाराष्ट्राचे ज्ञान, शहाणपण व मास्टर स्ट्रोक असा काही जणांनी समज करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मास्टर स्ट्रोक’ मारतात असे त्यांचे पगारी भगतगण नेहमी सांगतात. लोकमान्य टिळक सांगायचे, एक आण्याचा गांजा, चिलीम मारली की भरपूर कल्पना काही लोकांना सुचतात. भाजपच्या पगारी भजनी मंडळाचे तसेच आहे. श्री. फडणवीस यांनी आता असा ‘स्ट्रोक’ मारला आहे की, त्यावर भाजपचेच लोक अचंबित झाले. श्रीमन फडणवीस म्हणाले, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे.’ फडणवीस यांनी स्वतःच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते. आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे."
"हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर सुरू आहे व त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कलंकित होत आहे. आम्ही विदर्भाच्या दौऱ्यात सांगितले, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कलंकित केले. हा कलंक-बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथयाट सुरू केला. ही कलंकित नाचेगिरी गेल्या काही काळापासून महाराष्ट्र सहन करतोय. महाराष्ट्रात पूर्वी एकच लखोबा लोखंडे होता. आज अनेक नामचीन लखोबा लोखंड्यांना घेऊन भाजपने सरकार स्थापन केले. महाराष्ट्राच्या प्रतिमेस शेण फासण्याचाच हा प्रकार. राज्यातील राजकारणात नीतीतत्त्वाचे महत्त्व संपले. भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या नशिबी भ्रष्ट लखोबांच्या सतरंज्या उचलणे एवढेच आले. हा प्रकार म्हणजे सहन होत नाही व सांगताही येत नाही असाच आहे. देवेंद्र फडणवीस हे कलंकित नाहीत. ते एक थोर महात्मा किंवा गौरवपुरुष आहेत असे एकवेळ मान्य करू, मग दोन्ही मांड्यावर कलंकित दुर्योधन, कंसमामा, रावणास बसवून ते कोणते नीतीचे राज्य चालवीत आहेत?" असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
"सत्य असे की, महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले. त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक. ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल? यंत्रणांची दहशत माजवून चाणक्यगिरी चालली आहे. याला मर्दानगी म्हणता येत नाही. हा कलंकच आहे. फडणवीस म्हणतात, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?’ देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच. कुणाकुणाची नावे घ्यायची? आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा, भुजबळ; हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर या आजारावर एखादा उपचार करूनच घ्या. स्वतः शेण खायचे व दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असे एकंदरीत तुमचे धोरण दिसते. महाराष्ट्राच्या परंपरा व संस्कृतीवर शेणफेक करण्यात तुम्ही धन्यता मानत आहात. भ्रष्टाचारी गुन्हेगार, व्यभिचारी अशा लोकांना भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घालून त्यावर चांदीचा वर्ख चढवायचा व बाजारात उभे करायचे. या घाणेरडय़ा राजकारणास ‘कलंक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला राहिलेला नाही व नागपूरही आता खऱ्या संघ विचारांचे उरलेले नाही. तेथे भेसळच फार झाली आहे. क्षणभंगूर सत्ता संपादनासाठी भ्रष्टाचारी लोकांशी शय्यासोबत करण्यास नैतिकतेचे बिरुद मिरवणाऱयांनाही लाज वाटत नाही. अजित पवार, मुश्रीफ, गोंदियाचे पटेल, भुजबळ हे कलंकित की स्वच्छ राजकीय चारित्र्याचे हे फडणवीसांनी जाहीर करावे. फुटलेल्या शिवसेना आमदारांवरील ‘ईडी’ कारवाईच्या फायली कोणत्या बैलांच्या गोठय़ात दडपून त्यावर शेणसड्यांनी सारवण केले ते सुद्धा सांगा. महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेची माहिती नसलेले लोक सत्तेवर विराजमान झाले. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहात! ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना!" असा टोलाही फडणवीसांना लगावला.