Uddhav Thackeray vs Eknath Shinde: शिवसेना पार्टी फंडाचा पैसा वाटून टाका, आम्हाला काहीच नको; दीपक केसरकरांनी व्हीपवरही भाष्य केले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 02:33 PM2023-02-21T14:33:27+5:302023-02-21T14:34:03+5:30
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे.
शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत असा आमच्याविरोधात एक गैरसमज पसरवला आहे जातोय. परंतू तसे काही नाहीय. आम्हाला यापैकी काहीही नको. उद्धव ठाकरे यांच्याकडून केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन जायचे आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी सेनेची घटना बदलली आणि हक्क स्वतःकडे घेतले. शिवसैनिकाचे पैसे स्वतःच्या नावावर वळवले हे चुकीचे आहे. आम्ही महाराष्ट्रात एकत्र काम करणार, आदरापोटी आम्ही शांत आहोत. सहानुभूती निर्माण करणे आता बस झाले, आम्ही सहा महिन्यात काय केलं ते दाखवतो, तुम्ही अडीच वर्षात काय केलं दाखवा, असे आव्हान दीपक केसरकरांनी दिले आहे. पार्टी फंडातला पैसा सर्व शिवसैनिकांना द्यावा, अशी आम्ही मागणी करतो असेही केसरकर म्हणाले.
जे शासन म्हणून आमचे आहे ते आम्ही घेणार, आम्हाला दुसरे काही नको. राऊत म्हणायचे की ते बाळासाहेबांचे एकनिष्ठ आहेत. परंतू त्यांची पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल निष्ठा नाही. जी जबाबदारी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दिली होती ती अजून पूर्ण झालेली नाही. दोन हजार कोटींच जे बोलतायत त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं पाहिजे, माझं मत आज राष्ट्रीय कार्यकारणी मी मांडणार आहे, असे ते म्हणाले.
व्हीप बजावला तर जे जे चिन्हावर निवडुन आले त्यांना हा व्हीप पाळावा लागेल. ज्यांनी पाळला नाही त्यांच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, असेही केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्री लवकरच अयोध्या दौऱ्यावर जातील. योगी सरकार कडून महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा दिली जातेय. यासाठी दौरा थांबवला आहे. लवकरच दौऱ्याची घोषणा करू, असे ते म्हणाले.