उद्धव'नीती'... देवेंद्र फडणवीसांना शिवसेना मेळाव्याला बोलावण्यामागे वेगळीच खेळी?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 03:20 PM2019-06-19T15:20:51+5:302019-06-19T15:30:22+5:30
शिवसेनेच्या 'घरच्या कार्या'ला अचानक मुख्यमंत्र्यांच्या येण्यामागे प्रयोजन काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.
'८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हे ब्रीद घेऊन ५३ वर्षांपूर्वी स्थापन झालेली शिवसेना आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ८०-२०चं सूत्र बदलून १०० टक्के राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण, हे नवं सूत्र सेनेच्या उगवत्या नेतृत्वानं अंगिकारलं आहे आणि त्याचा पक्षाला फायदाही होताना दिसतोय. 'मिशन लोकसभा' फत्ते केल्यानंतर आता विधानसभेच्या रणसंग्रामासाठी ते सज्ज होत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचा आजचा ५३वा वर्धापन दिन मेळावा महत्त्वपूर्ण मानला जातोय, दिशादर्शक मानला जातोय. हा मेळावा वेगळ्या अर्थाने ऐतिहासिकही ठरणार आहे. त्याचं कारण आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्यातील उपस्थिती.
शिवसेनेचे आजवरचे ५२ वर्धापनदिन मेळावे पाहिले, तर त्यात अन्य पक्षाचा कुणी नेता खास आमंत्रित केल्याचं ऐकिवात नाही. अनेक वर्षं बाळासाहेबांचं खास 'ठाकरी भाषण' हेच या मेळाव्याचं आकर्षण असायचं. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यातून पक्षाची भूमिका मांडण्यावर भर दिला. म्हणूनच, या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, ही बातमी येताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक वर्षं शिवसेना-भाजपा युती आहे, भाजपातील अनेक नेत्यांशी बाळासाहेबांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते, तरीही त्यांच्यापैकी कुणी नेता शिवसेनेच्या मेळाव्याला नसायचा. मग, यावेळी अचानक शिवसेनेच्या 'घरच्या कार्या'ला मुख्यमंत्र्यांच्या येण्यामागे प्रयोजन काय, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता, ही 'उद्धवनीती' असल्याचं लक्षात आलं.
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच, मुख्यमंत्री कुणाचा?, भाजपाचा की शिवसेनेचा? अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी तर अनेक नेत्यांची 'मन की बात' उघड झाली. आदित्य ठाकरे यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी पुढे येणं, ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हणणं, एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी शक्तिप्रदर्शन करणं, हे सगळं पुरेसं सूचक आहे. शिवसेनेतील नेत्यांच्या या महत्त्वाकांक्षा पाहूनच, त्यांना सबुरीचा संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना मेळाव्याला बोलावलं असू शकतं, असं राजकीय जाणकारांना वाटतं.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी एक गट भलताच सक्रिय झालेला दिसतोय. आदित्य यांनी स्वतः त्यांची इच्छा बोलून दाखवली नसली, तरी त्यांचा '१०० टक्के राजकारण' फॉर्म्युला पाहता त्यांची तशी महत्त्वाकांक्षा असूच शकते. परंतु, एकंदर देशातील हवा पाहिल्यानंतर, उद्धव ठाकरे 'आस्ते कदम' टाकू इच्छितात, असं स्पष्ट दिसतंय.
देवेंद्र फडणवीस यांची 'मिस्टर क्लीन' ही इमेज शिवसेनेसाठी फायद्याची असल्याचं ओळखून, युतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच 'प्रमोट' करायचा उद्धव यांचा मानस आहे. त्याची जाणीव सगळ्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना करून देण्यासाठी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं असावं, याकडे जाणकारांनी लक्ष वेधलं.
पुढच्या वर्धापनदिनाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा निर्धार आज 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. परंतु, उद्धव तसं काहीही विधान आजच्या मेळाव्यात, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्याची शक्यता नाही. उलट, भाजपासोबतची युती भक्कम असल्याचाच संदेश देण्याचा प्रयत्न या मेळाव्यातून होईल.
गेल्या काही दिवसांमध्ये, मुख्यमंत्रिपद वाटपाच्या (अडीच-अडीच वर्षं) मुद्द्यावरून युतीत थोडी नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. स्वाभाविकच, या चर्चांमुळे सामान्य कार्यकर्त्यांची चलबिचल होते. कुंपणावर बसलेले उड्या मारायला लागतात. हे लक्षात घेऊनच, भाजपाध्यक्ष अमित शहा किंवा मुख्यमंत्र्यांशिवाय अन्य कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका, अशा सूचना उद्धव यांनी अलीकडेच केल्या होत्या. आज थेट देवेंद्र यांना मेळाव्याला बोलावून युतीबाबतच्या शंकाकुशंकांवर पडदा टाकण्याची चतुराई उद्धव यांनी दाखवल्याचं जाणकारांनी नमूद केलं.
'मी शिवसेना सोडून देईन' का म्हणाले होते असं बाळासाहेब ठाकरे? ऐका राजकारणाचे किस्से : एपिसोड ६ pic.twitter.com/Qllg2FHxdi
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2019
जाणून घ्या, कसा आहे शिवसेनेचा 53 वर्षाचा धगधगता इतिहास! @ShivSenahttps://t.co/67zaSKGtC9
— Lokmat (@MiLOKMAT) June 19, 2019
शिवसेनेच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार https://t.co/guDfRnsNYc
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2019