"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:57 AM2024-05-12T11:57:40+5:302024-05-12T12:01:13+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या वातावरणात राजकीय नेते विविध मुलाखतींमधून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षातच पायउतार व्हावं लागलं होतं. मात्र १९९९ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
२०१९ साली महायुतीचे सरकार निवडूण आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन युतीमध्ये फूट पडली होती. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. मात्र अडीच वर्षाच्या काळात त्यांना पद सोडावं लागलं आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर आलं. मात्र उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सकाळला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी याबाबत भाष्य केले.
१९९९ पासूनच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली - देवेंद्र फडणवीस
"उद्धव ठाकरे आमच्यासाठी वंदनीय असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र होते. काही गोष्टी लक्षात आल्या तरी आम्ही बोलायचो नाही. ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी श्रद्धेपोटी तसे वागायचो. खरे तर उध्दव ठाकरेंना तर युतीची सत्ता आल्यानंतर १९९९ पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली होती. १९९९ च्या निवडणूक निकालांनंतर त्यांचे नाव पुढे येईना मुख्यमंत्रिपदासाठी म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. नारायण राणे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्याची सोय बघितली. तसे पाहिले तर राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काही गैर नाही पण त्यामागचा हेतू काय हे सार्वजनिक जीवनात महत्त्वाचे असते. उद्धव ठाकरेंना जनहितापेक्षाही पद महत्त्वाचे वाटत असावे असे वाटते," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"आम्ही वैचारिक निष्ठांना सर्वाधिक महत्त्व देतो. उध्दव ठाकरे काँग्रेससमवेत जातील असे कधीच वाटले नाही. मनापासून सांगतो. बाळासाहेबांचे चिरंजीव कसे वागू शकतात यावर आमचा विश्वास होता. आमची चूक झाली. आमच्यात हिंदुत्वाचे बंध होते. त्या भावनांचा आदर करत आम्ही युती केली होती," असंही फडणवीस म्हणाले.
"सत्ता आणूनही मुख्यमंत्री झालो नाही याचा मलाही धक्का बसला होता. अर्थात एखादा दिवस. नंतर लगेच मी विरोधी पक्षनेता या नात्याने काम करू लागलो. संकटे येत असतात.ते आव्हान असते . पुढे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याबाबतचा निर्णय घेण्यात माझा महत्त्वाचा सहभाग होता. पक्षकार्यकर्ता म्हणून मी ते केले," असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला.