"पहाटेच्या शपथविधीने फायदाच, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:08 AM2023-02-23T07:08:28+5:302023-02-23T07:09:23+5:30
‘कट्टर शिवसैनिक ठाकरेंसोबतच आहेत’, शरद पवारांचा विश्वास
पिंपरी (पुणे) : राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली हाच पहाटेच्या शपथविधीचा फायदा आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. तसेच कट्टर शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांना माहिती होते, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबाबत पवार म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झालं तरी एकाच व्यक्तीचं नाव घेतलं जातं. मात्र, या शपथविधीचे काही फायदेही झाले. त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार आले. दरम्यान संध्याकाळी त्यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन केले.
निवडणूक आयोगाला कोण मार्गदर्शन करतंय?
सत्तेचा गैरवापर करून एखाद्या राजकीय पक्षाचे व एखाद्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी लोक त्या नेतृत्वासोबत उभे राहतात. यापूर्वीही काही पक्षांमध्ये फूट पडली. मात्र, रागाची भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या पक्षाचे नाव व चिन्ह काढून घेण्याचा प्रकार आजपर्यंत झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोग स्वत: निर्णय घेतंय का त्यांना कोणी मार्गदर्शन करतंय हे महत्त्वाचं आहे, असे पवार म्हणाले.