बाळासाहेबांच्या स्मारकाचे अध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे
By admin | Published: September 28, 2016 01:39 AM2016-09-28T01:39:01+5:302016-09-28T01:39:01+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने आज सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून, त्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासनाने आज सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून, त्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई हे या ट्रस्टचे सदस्य सचिव असतील. भाजपाच्या खासदार पूनम महाजन, उद्धव यांचे पुत्र आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, आर्किटेक्ट शशी प्रभू हे सदस्य असतील. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे (२) सचिव, विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि पालिकेचे आयुक्त हे या ट्रस्टचे पदसिद्ध सदस्य असतील. ट्रस्टची रीतसर स्थापना झाल्यानंतर त्याच्या सर्वसाधारण सदस्यांमधून एक आणि आजीव सदस्यांमधून एक असे दोन सदस्य निवडण्यात येतील. तूर्तास या दोन्ही जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. महापौर बंगल्याच्या जागेवर हे स्मारक उभारण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही जागा निश्चित केली होती. स्मारकासाठी शासनाने ट्रस्ट स्थापन करावा, अशी शिफारसदेखील या समितीने केली होती. ट्रस्टची रीतसर नोंदणी करण्याचे अधिकार सुभाष देसाई यांना देण्यात आले आहेत. (विशेष प्रतिनिधी)