Uddhav Thackeray: 'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 08:24 PM2022-09-21T20:24:11+5:302022-09-21T20:25:15+5:30
Uddhav Thackeray: 'ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे.'
मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, ठाकरेंच्या घरावर टीका करणाऱ्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.
संबंधित बातमी- 'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
उद्धव ठाकरे म्हणाले, 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. निवडणुक आल्यावरच तुम्ही येता, तुमच्यासाठी मुंबई फक्त जमिनीचा तुकडा असेल. पण, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे. मुंबादेवी म्हणजेच मुंबई आमची आई आहे. आजकाल आईला गिळणारी लोकही येत आहे. मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय? मी पहिल्यांदा कमळाबाईवर बोलतोय. हा शब्द माझा नाही, बाळासाहेबांनी दिलाय. मुंबईवर चालून येण्याचे धाडस करू नका. दसऱ्याला यांची लख्तरे काढणारच आहे,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
'आमच्या घराण्यावर टीका कराल तर...'
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र समितीत सर्वात पुढे होते, मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही लढलो. तेव्हा जनसंघ समिती फोडून बाहेर पडला. ही त्यांचीच औलाद आहेत,' अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
'युतीत 25 वर्षे सडली'
'दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी पुन्हा बोलतोय, 25 वर्षे युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक माणसे जोपासली. मेहनत आम्ही घ्यायची आणि फुकत त्यांना द्यायच. आमच्या जिवावर वरती पोचलात आणि आम्हाला लाथा मारताय. वंशवादावर टीका करणार असाल, तर तुमचा वंश कोणता, त्यावर आधी बोला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.