प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बसून मोदी फेस्टिव्हल साजरा होणार - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 07:27 AM2017-05-19T07:27:39+5:302017-05-19T07:27:39+5:30
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये?
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये? गरजणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस बंदूक रोखीत आहेत. तूरडाळीस भाव मागणाऱ्यांना शिव्यांची लाखोली मिळत आहे. शेतकऱ्यास गुलाम करून मारण्याचे हे कारस्थान आहे अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे.
नाशिक परिसरातील १४० गावांतील शेतकरी संपावर चालले आहेत. हा निर्णय सिंहासनास हादरा दिल्याशिवाय राहणार नाही असे अग्रलेखात म्हटले आहे. फोडा, झोडा आणि सत्ता टिकवा या मलिदाछाप धोरणाने सुरू असलेले राज्य शेतकऱ्याला जगू देत नाही व अन्यायाविरुद्ध लढू देत नाही. शेतकरी कर्जकोंडीत अडकला आहे.
शेतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा आक्रोश सुरू आहे, मात्र सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे प्रेतांचे ढिगारे पडले तरी बेहत्तर पण कर्जमाफी मिळणार नाही. या प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बसून मोदी फेस्टिव्हल साजरा करणा-या सरकारच्या विरोधात शेतकरी गर्जना करणार असेल तर फडणवीसांचे सरकार त्या गरीब शेतकऱ्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकवणार आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये? गरजणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस बंदूक रोखीत आहेत. तूरडाळीस भाव मागणाऱ्यांना शिव्यांची लाखोली मिळत आहे. शेतकऱ्यास गुलाम करून मारण्याचे हे कारस्थान आहे. ते उधळून लावण्यासाठी नाशकात आज शेतकऱ्यांची गर्जना होत आहे. ही गर्जना सिंहासनास हादरा दिल्याशिवाय राहणार नाही.
- गर्जेल तो पडेल काय? असे नेहमीच विचारले जाते, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची गर्जना आता पडणार नाही. नाशिक परिसरातील १४० गावांतील शेतकरी संपावर चालले आहेत. हा निर्णय त्यांनी एका वैफल्यातून घेतला आहे. त्यांना स्वतःसाठीही पिकवायचे नाही आणि बाजारात विकण्यासाठीही पिकवायचे नाही. शेती हीच आमची काळी आई. आई संपावर जात असेल तर ही सरकारची नामुष्की आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाचे मोर्चे निघाले तेव्हा त्यांच्या संघटनांत फूट पाडण्यात आली. सदाभाऊ खोत व राजू शेट्टी यांच्यात उभी फूट पाडून त्यांनी जो क्लेश निर्माण केला त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतही फूट पडली आहे. फोडा, झोडा आणि सत्ता टिकवा या मलिदाछाप धोरणाने सुरू असलेले राज्य शेतकऱ्याला जगू देत नाही व अन्यायाविरुद्ध लढू देत नाही. शेतकरी कर्जकोंडीत अडकला आहे.
- शेतीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीचा आक्रोश सुरू आहे, मात्र सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे प्रेतांचे ढिगारे पडले तरी बेहत्तर पण कर्जमाफी मिळणार नाही. या प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बसून मोदी फेस्टिव्हल साजरा करणा-या सरकारच्या विरोधात शेतकरी गर्जना करणार असेल तर फडणवीसांचे सरकार त्या गरीब शेतकऱ्यास देशद्रोही ठरवून फासावर लटकवणार आहे काय? शेतीपेक्षा सरकारला बिल्डरांचे व धनिकांचे हित प्यारे बनले आहे. शेतकऱ्याला नक्की काय हवे आहे याचा विचार सरकार म्हणून खुर्च्या उबवणाऱ्यांनी कधी केला आहे काय?
- शेतक-यांच्या या सरळसोट मागण्या आहेतच. शेती करण्याची व पिकवण्याची त्याची क्षमता आज संपली आहे. शेतकरी हा भाकड गुरांपेक्षाही लाचार आणि असहाय्य बनला आहे. समृद्धी महामार्गाचा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या विझलेल्या चुली पेटणे महत्त्वाचे आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मग शेतकऱ्यांच्या प्रेतांचा खच रोखणे हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट का असू नये? गरजणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीस बंदूक रोखीत आहेत. दंडुके चालवीत आहेत. तूरडाळीस भाव मागणाऱ्यांना शिव्यांची लाखोली मिळत आहे. मरणाऱ्या शेतकऱ्यांचे विडंबन चालले आहे. शेतकऱ्यास गुलाम करून मारण्याचे हे कारस्थान आहे. ते उधळून लावण्यासाठी नाशकात आज शेतकऱ्यांची गर्जना होत आहे. ही गर्जना सिंहासनास हादरा दिल्याशिवाय राहणार नाही.