पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा माफीनामा
By admin | Published: October 2, 2016 02:48 AM2016-10-02T02:48:18+5:302016-10-02T02:48:18+5:30
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात मराठा समाजाच्या मोर्चाशी संबंधित व्यंगचित्र छापल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली. ‘पक्षप्रमुख, शिवसेना
मुंबई : शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रात मराठा समाजाच्या मोर्चाशी संबंधित व्यंगचित्र छापल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर माफी मागितली. ‘पक्षप्रमुख, शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आणि सामनाचा संपादक म्हणून मी या व्यंगचित्राबाबत माता-भगिनींची माफी मागतो,’ असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘दैनिक सामनामधील व्यंगचित्रातून कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. महिलेचा अपमान करणारी प्रवृत्ती शिवसेनेमध्ये नाही. तथापि, या व्यंगचित्रावरून झालेली टीका माझ्या जिव्हारी लागली. गेल्या पाच-सहा दिवसांत काही प्रवृत्तींनी खुसपट काढले, तरी समाजाने शिवसेनेवरील विश्वास ढळू दिला नाही. शिवराय आमचे दैवत आहे. त्या व्यंगचित्राने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माझ्या आईला स्मरून माफी मागतो. या विषयाचे घाणेरडे राजकारण केले गेले.’
‘आपल्या माफीनंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी माफी मागण्याचा विषय संपला आहे का,’ या प्रश्नाचे उत्तर ठाकरे यांनी दिले नाही. ‘कुणाला खुसपट काढायचे ते काढू देत. आमच्यासाठी आता हा विषय संपला आहे,’ असे ते म्हणाले.
मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चात आपण सहभागी होणार का, या प्रश्नात उद्धव ठाकरे म्हणाले की, तसे आमंत्रण आपल्याला आलेले नाही. आमंत्रणाची गरजदेखील नाही. मात्र, या मोर्चेकऱ्यांनी राजकारण्यांना दूर ठेवले, ही बाब स्वागतार्ह आहे. गेल्या १५ वर्षांच्या कारभारामुळे अडलेली आणि नाडलेली जनता या निमित्ताने रस्त्यावर आली आहे.
उद्धव यांनी पत्रपरिषदेत माफी मागितली, तेव्हा उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि माजी मंत्री लीलाधर डाके उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, ही आमची भूमिका आहे. आरक्षण व अॅट्रॉसिटीसंदर्भात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्या, अशी आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना
शहाणपण उशिरा सुचले - विखे
उद्धव ठाकरेंचा माफीनामा म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. माफीनाम्यातही त्यांचा संकुचितपणा दिसून आला. त्यांनी माता-भगिनींची माफी मागतानाच मराठा समाजाचीही माफी मागायला हवी होती, परंतु त्यांनी तसे केले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ठाकरे यांना मराठा समाजाच्या असंतोषामुळे माफी मागणे भाग पडले. मनापासून माफी मागायची असती, तर व्यंगचित्र छापून आल्यानंतर लगेच मागायला हवी होती, असे विखे पाटील म्हणाले.