उद्धव ठाकरेंची पाठ फिरत नाही तोच शिवसैनिक शिंदे गटात; ढोलताश्यांच्या गजरात मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:22 PM2023-07-10T21:22:41+5:302023-07-10T21:22:58+5:30
आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम-यवतमाळ करत ठाकरेंनी अमरावतीत काल रात्री मुक्काम केला होता. यावेळी अमरावतीत ठाकरे समर्थक आणि राणा समर्थकांत पोस्टर फाडण्याची स्पर्धा रंगली होती. अमरावतीतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठाकरे नागपूरमध्ये जात नाहीत तोच शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अमरावती शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे. जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वाखाली तरुण शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावतीत एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही बोगस लोक म्हणतात की मी भीक मागायला आलो आहे. होय, मी मतांची भीक मागायलाच आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्हाला आमदार विकत घेता येतात, पण त्याच पैशातून माणसांना वाचवता येत नाही. माणसं वाचवले तर त्यांच्या आशिर्वादाने तुम्हाला कुणाला विकत घेण्याची गरज लागणार नाही. कामच करायचे नाही. हे फोड, ते फोड करायचे. जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवता, मग तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडायची काय गरज? शिवसेना चोरली, आता राष्ट्रवादी चोरताय. देशातील गोष्टी विकायच्या आणि दुसऱ्यांचे चोरायचे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे, पण त्यांच्यात आत्मविश्वास नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
तुम्ही नामर्द आहात
ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही सत्ताधीश आहात, पण निवडून येईल असे वाटत नाही. म्हणूनच ईडी, सीबीआयला मागे लावता. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजुला ठेवून समोर या. राजकारणातले नामर्द तुम्ही. तुमचे दोन खासदार होते, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावरुन शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर बसून महाराष्ट्रात फिरवलं आणि तुम्हीच आम्हाला राजकारणातून संपवायला निघालात.