उद्धव ठाकरे यांच्या बाँडीगार्डला शिवसैनिकांंकडून धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:26 PM2017-11-12T22:26:39+5:302017-11-12T22:35:49+5:30
कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॉडिगार्डला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबाद : कन्नड येथील कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॉडिगार्डला औरंगाबाद विमानतळावर शिवसैनिकांनीच धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कन्नड येथील एका कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी औरंगाबाद विमानतळावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनतील सर्वच गटांनी जोरदार तयारी केली होती. यामुळे विमानतळावर गर्दी उसळली.
या गर्दीमध्ये प्रत्येक जणाला उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचायचे होते. या गर्दीला आवरण्याचा प्रयत्न त्यांचे बॉडीगार्ड करत होते. याचवेळी एका गार्डकडून नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना धक्का लागला.
याच राग मनात ठेवत जंजाळ यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे समोरच्या गाडीत बसल्यानंतर पाठीमागच्या गाडीत बॉडीगार्ड बसत असताना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे समजते.
हा वाद विकोपाला जात असतानाच महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी मध्यस्थी करत शिवसैनिकांना शांत केले. यामुळे पुढील सर्व अनर्थ टळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेविषयी माहिती घेण्यासाठी राजेंद्र जंजाळ यांना अनेकवेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
गटबाजीतुन घडलेला प्रकार
औरंगाबाद शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गटबाजी समोर आली आहे. नुकतेच खा. चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात रस्त्यावरच वाद झाले.
यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे आयोजित केलेल्या कार्यक्रात खैरे समर्थक दुसरे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांना डावलले.
याचवेळी खा. खैरे आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील सख्य प्रसिद्ध आहे. यातुनच औरंगाबाद विमातळावरील हा प्रकार घडला असल्याचे समोर येत आहे.