उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 07:54 AM2017-08-23T07:54:24+5:302017-08-23T10:39:16+5:30
सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजपाला टार्गेट केले आहे.
मुंबई, दि. 23 - मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर्चस्व मिळवता आले. 95 पैकी तब्बल 61 जागा जिंकून भाजपाने मिळवलेला विजय हा आतापर्यंत मीरा- भार्इंदर महापालिकेत एका पक्षाने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. दरम्यान, जैन धर्माचे मुनी नयपद्मसागर महाराज यांनीही जाहीरपणे भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत शिवसेनेला केलेला विरोधही भाजपाच्या फायद्याचा ठरला. यावरुनच सामना संपादकीयमधून भाजपाला पुन्हा एकदा टार्गेट करण्यात आले आहे.
मीरा-भाईंदरच्या निवडणूक प्रचारात जैन धर्मीयांचे ‘मुनी’ उतरले व त्यांनी ज्या भाषेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. ती भाषा व कृती एखाद्या जैन मुनीस शोभणारी नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवाय, निवडणुकीत एखाद्या धर्मगुरूनेच जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर आधी कायद्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालादरम्यानही शिवसेनेच्या हाती भोपळा लागला, अशी टीका करण्यात आली होती. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
''आम्ही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा पाळत नसलो तरी भोपळ्याची भाजी ही ‘श्राद्ध’ वगैरे समयी विशेष करून पितरांसाठी केली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या हाती लागलेला भोपळा हा संकेत समजावा. हा भोपळाच उतणाऱ्या-मातणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही.'', असे उद्धव ठाकरे यांनी सामनामध्ये म्हटले आहे.
काय आहे सामना संपादकीय?
पनवेलनंतर मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला आहे. पनवेलात शिवसेनेच्या हाती भोपळा लागला असे बोलणाऱ्यांना आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, बाबांनो उतू नका, मातू नका. अर्थात या ऊतमात करणाऱ्यांच्या हाती कोणताही वसा नसल्याने घेतला वसा सोडू नका असे बजावण्यातही अर्थ नाही. पनवेलचे रेतीसम्राट अब्जोपती ठेकेदार दत्तक घेतले नसते तर तुमच्या हाती ‘लिंबू’ही लागले नसते व सुकलेली लिंबे चोळत बसण्याची वेळ तुमच्यावर आली असती. दुसरे असे की, भोपळ्याची आठवण करून दिलीच आहे म्हणून सांगायचे. आम्ही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा पाळत नसलो तरी भोपळ्याची भाजी ही ‘श्राद्ध’ वगैरे समयी विशेष करून पितरांसाठी केली जाते. त्यामुळे शिवसेनेच्या हाती लागलेला भोपळा हा संकेत समजावा. हा भोपळाच उतणाऱ्या-मातणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. राहता राहिला विषय मीरा-भाईंदर निवडणुकांचा. येथे कमळाबाईंवर मतांची दौलतजादा झाली व ‘६१-६२’ जागा जिंकून भाजप बहुमताने सत्ताधीश झाला. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे २२ जागा जिंकून मागे पडली तरी त्याची खंत वाटण्याचे कारण नाही. मीरा-भाईंदरचे निकाल हे धक्कादायक वगैरे नाहीत. येथे सरळ जातीयवादी प्रचार झाला. धर्मगुरू हा कोणत्याही धर्माचा असो. संयम आणि शांततेचा संदेश हीच त्याची भूमिका असायला हवी, पण मीरा-भाईंदरच्या निवडणूक प्रचारात जैन धर्मीयांचे ‘मुनी’ उतरले व त्यांनी ज्या भाषेत भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला. ती भाषा व कृती एखाद्या जैन मुनीस शोभणारी नाही. मोह, माया, मत्सरापासून लांब राहण्याचे सोडून सरळ चौकाचौकात प्रचार सभा घेणे हे कोणते राजकारण? या निवडणुकीत एखाद्या धर्मगुरूनेच जातीय विष पेरण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर आधी कायद्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जामा मशिदीच्या इमामाप्रमाणे इतर धर्मगुरू वागू लागले तर हा देश अस्थिर व अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. मीरा-भाईंदरमधील ‘मराठी’ टक्का हा शिवसेनेबरोबर राहिला, पण मुंबईप्रमाणेच इतर जात-प्रांतवाले महाराष्ट्रात राहून जातीय प्रचारात ओंडक्याप्रमाणे वाहून गेले. त्यामुळे पनवेलातील भोपळा आता जातीय उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आमचा धृतराष्ट्र झालेला नाही!