उद्धव ठाकरेंची अवस्था गजनीतल्या आमीर खानसारखी -राधाकृष्ण विखे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 09:22 PM2017-09-27T21:22:43+5:302017-09-27T21:23:20+5:30
उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसह विविध मुद्यांवर सातत्याने भूमिका बदलली आहे. त्यांना आता आपल्या भुमिकेचाच विसर पडला आहे. त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमीर खानसारखी झाली आहे.
पुणे - ‘उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीसह विविध मुद्यांवर सातत्याने भूमिका बदलली आहे. त्यांना आता आपल्या भुमिकेचाच विसर पडला आहे. त्यांची अवस्था गजनी चित्रपटातील आमीर खानसारखी झाली आहे. शिवसेनेने अस्तित्व गमावले असून ते दाखविण्यासाठी आता रस्त्यावर येवून आंदोलन करावे लागत आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. शिवसेना-भाजपमधील वादावर बोलताना त्यांनी शिवसेना हाच मोठा विरोधी झाल्याचे टीका केली. कर्जमाफीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. कर्जमाफीच्या नियमांमध्ये सातत्याने बदल केल्याने आता सरकारच्या हेतुबद्दलच शंका येत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष पसरला आहे. शासकीय यंत्रणा कुचकामी ठरली असून एकही मंत्री त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत नाही. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळेही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र व राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय अधोगतीकडे नेणारा आहे.
नारायण राणे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, त्यांनी काँग्रेसमध्येच राहून मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा होती. आता निर्णयानंतर त्यांची पुढील वाटचाल काही असेल, निर्णय चुक की बरोबर याचे मुल्यमापन त्यांनीच करावे. विरोधी पक्षनेत्याचा रिमोट कंट्रोल राणेंच्या हातात असल्याच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना विखे पाटील यांनी ‘त्यांचा रिमोट कोणाच्या हातात आहे, हे तरी त्यांना माहिती आहे का?’ विरोधी पक्षनेता संख्याबळावर ठरतो. कोणतेही पद कायमस्वरूपी नसते. आमचे संख्याबळ कमी झाले तर मी आनंदाने हे पद सोडेन, असे उत्तर दिले.