मंत्री, पालकमंत्री होण्याची स्वप्ने 'ते' रंगवत आहेत, उद्धव ठाकरे यांची भरत गोगावलेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 08:45 AM2024-02-03T08:45:15+5:302024-02-03T08:45:56+5:30
Uddhav Thackeray Criticize Bharat Gogavle: नॅपकिन फडकविणारे आज मंत्री होणार, उद्या होणार, परवा मंत्री होणार, पालकमंत्री होणार, अशी स्वप्ने रंगवत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर केली.
अलिबाग - नॅपकिन फडकविणारे आज मंत्री होणार, उद्या होणार, परवा मंत्री होणार, पालकमंत्री होणार, अशी स्वप्ने रंगवत आहेत, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार भरत गोगावले यांच्यावर केली. ठाकरे यांनी पोलादपूर, म्हसळा, माणगाव येथे जनसंवाद मेळाव्यात भाजपसह खा. सुनील तटकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ठाकरे गटाचे माजी खा. अनंत गीते, आमदार भास्कर जाधव यांनीही विरोधकांवर तोंडसुख घेतले.
शिवसेना म्हटले की हिंदुत्व आलेच, मुस्लिम समाजही आपल्यासोबत आला आहे. तो माझा आहे. ही आमची स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका आहे. कोरोना असताना भेदभाव केला नाही. ज्यांनी देशाचा चोर बाजार मांडलाय त्यांना तुम्ही मत देणार का? ही माती हरत नाही, हुकूमशहापुढे झुकत नाही, हा या मातीचा इतिहास आहे, असेही ठाकरे जनसंवाद मेळाव्यात म्हणाले.
आपल्याच लोकांना आडवे करायचे
पक्षात राहायचे आणि आपल्याच लोकांना आडवे करायचे, हे मी कधी केले नाही. आपल्याच घरातील मुलाला, मुलीला, भावाला, पुतण्याला आमदार केले. शरद पवार यांच्याशी गद्दारी केली. जो कुटुंबाचा झाला नाही, जो नेत्याचा झाला नाही तो तुमचा होणार नाही, अशी टीका खा. सुनील तटकरे यांचे नाव न घेता आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर केली.
...तर पुन्हा पवारांकडे जाणार का?
घराणेशाहीला विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुनील तटकरे यांच्या घरातील किती जणांना तिकीट देणार आणि नाही दिले तर ताटाखालचे मांजर होणार की पुन्हा पवार साहेबांकडे जाणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी तटकरेंना केला.