"आदित्य-तेजस काका काका म्हणत होते, पण घरातलाच माणूस उलटा फिरला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:49 PM2024-03-08T15:49:12+5:302024-03-08T15:49:47+5:30
आता उद्धव ठाकरेंसोबत कुणी नाही, मग आता वेळ आलीय शिवसेनेला संपवा हे २०१४ चे वाक्य आहे असा दावा ठाकरेंनी सभेत केला.
धाराशिव -भाजपा, मिंदे, दुसरे ७० हजार कोटीवाले जे तिकडे गेलेत. निर्लज्जम सदासुखी...ही जी माणसं सोडून गेली त्यातल्या काहींना मी माझ्या लहानपणापासून बघत आलोय, काहींना त्यांच्या लहानपणापासून बघतोय. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरून दिले, आम्ही त्यांना भरभरून दिले. घरातील कुटुंबाप्रमाणे वागलो. आदित्य-तेजस त्यांना काका काका म्हणून बोलत होते. आम्हालाही तो धक्का होता. आपल्या घरातील माणूस एवढा उलटा फिरू शकतो आणखी मी काय देऊ असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिवसेना सोडणाऱ्यांवर घणाघात केला.
धाराशिवच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या मनात मुख्यमंत्रिपद नव्हते. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की भाजपाने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. होय, केलाच. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शब्द दिला होता. त्यानंतर तो शब्द नाकारलेला आहे. त्यांनी आम्हाला दगा दिला. मी बाळासाहेबांना वचन दिले होते. मी पहिल्यांदा त्यांना माझे वडील म्हणून पाहिलेले आहे. पुत्र म्हणून त्यांना शेवटच्या काळात सांगितले होते, तुम्ही काळजी करू नका. एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन असं वचन दिले नव्हते. त्यामुळे माझे वचन अजून अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे. माझे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो असं ठाकरेंनी म्हटलं.
तसेच भाजपा वापरा आणि फेकून द्या असं त्यांच्यासोबत गेलेले म्हणतात. नितीन गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर केले नाही. मोदी-शाह हे नाव भाजपात आहेत हेदेखील आम्हाला माहिती नव्हते तेव्हापासून महाजन मुंडे यांना ओळखतो. ते आमच्या कुटुंबाचे भाग आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आम्ही तेव्हाही हिंदू होतो, आजही आहोत. २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली होती. कशासाठी? तरीदेखील हिंदुत्व म्हणून पुन्हा एकत्र आलो. आता बाळासाहेब ठाकरे राहिले नाहीत. ज्यांनी तुम्हाला वाचवलं, आता उद्धव ठाकरेंसोबत कुणी नाही, मग आता वेळ आलीय शिवसेनेला संपवा हे २०१४ चे वाक्य आहे. जे भाजपाच्याच एका नेत्याने मला सांगितले असा दावा उद्धव ठाकरेंनी सभेत केला.