उद्धव ठाकरे यांचे १८ खासदारांसह एकवीरा दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:19 AM2019-06-02T03:19:11+5:302019-06-02T03:19:32+5:30
शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवीचे दर्शन घेण्याची ठाकरे परिवाराची परंपरा आहे
लोणावळा (जि. पुणे) : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळाल्यानंतर शनिवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे व विजयी खासदारांसह कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकवीरा देवीचे दर्शन घेतले.
शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवीचे दर्शन घेण्याची ठाकरे परिवाराची परंपरा आहे. या प्रथेप्रमाणे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकवीरा देवीचे दर्शन घेत ‘महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे’ असे साकडे घातले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या २५ पैकी १८ खासदारांनी भरघोस यश मिळविले. या विजयाचा आनंद व देवीला केलेला नवस फेडण्याकरिता ठाकरे आज सर्व विजयी खासदारांना घेऊन गडावर आले होते. विधिवत पूजा करीत देवीची ओटी रश्मी ठाकरे यांनी भरली. यानंतर देवीची आरती करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित मंत्री अरविंद सावंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तीकर, राजन विचारे, भावना गवळी, राहुल शेवाळे, विनायक राऊत, धैर्यशील माने, संजय मंडलिक, हेमंत गोडसे, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, संजय जाधव, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर, हेमंत पाटील यांच्यासह एकवीरा देवस्थानाचे माजी अध्यक्ष व शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
मंत्रिमंडळात निवड झाल्याचा आनंद - सावंत
अवजड उद्योगमंत्री पदावर आपण समाधानी आहात का, या प्रश्नावर बोलताना शिवसेनेचे नवनिर्वाचित मंत्री अरविंद सावंत म्हणाले, मंत्रिपद कोणते मिळाले, यापेक्षा मी त्या मंत्रिमंडळात सिलेक्ट झालो हे फार महत्त्वाचे आहे. माझी शिफारस हाच माझ्यासाठी भाग्याचा क्षण.