शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीत पहिलं यश; कार्यकर्त्यांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:55 AM2022-08-05T11:55:56+5:302022-08-05T11:56:36+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला आहे.
सोलापूर - राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर सेनेचे तब्बल ५५ पैकी ४० आमदार आणि १२ खासदार फुटून शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंच्या बंडामुळे राज्यातील सत्तेतून पायउतार झालेल्या उद्धव ठाकरे यांना सोलापूरच्या निवडणुकीच्या निकालाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७ सदस्य असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाला जोरदार यश मिळालं असून ७ पैकी ७ सदस्य ठाकरे गटाचे निवडून आले आहेत.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. सोलापूरात देशमुख यांचे वर्चस्व आहे. मात्र चिचंपूरमधील ग्रामपंचायतीच्या निकालाने उद्धव ठाकरे गटाने बाजी मारत भाजपाला चितपट केले आहे. राज्यात आज १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार असून या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ९ तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. यात पहिला निकाल चिंचपूर ग्रामपंचायतीचा लागला असून शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे ७ पैकी ७ सदस्य निवडून आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्या निकालात स्थानिक पातळीवरील राजकारण असले तरी त्यातून जनमाणसाचा कानोसा घेतला जातो. चिंचपूरच्या निकालानंतर आता उर्वरित ग्रामपंचायीत कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना लागली आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे गट
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडत शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे विचार बाजूला केले परंतु आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन वाटचाल करतोय. आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांनी पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यात शिवसेनेत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशी फूट पडल्याचं दिसून येते. त्यामुळे चिंचपूरच्या ग्रामपंचायत निकालाने उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.