उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला 'त्या' नेत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:36 PM2022-09-06T12:36:44+5:302022-09-06T12:38:08+5:30
नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली.
सोलापूर - राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. २०१९ मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्यांच्यावर विश्वास ठेवत करमाळ्याची उमेदवारी दिली त्या रश्मी बागल यादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी रश्मी बागल यांनी भेट घेतली त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीत रश्मी बागल या करमाळ्यातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांच्याविरोधात माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षात बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले. त्यावेळी मतात फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदे आमदार म्हणून निवडून आले. त्यात नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्रित आणण्याच्या प्रयत्न तानाजी सावंत करत आहेत. त्यातूनच पुण्यातील घरी तानाजी सावंत यांनी एकाचवेळी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांची बैठक घेतली. माजी आमदार नारायण पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात रश्मी बागल यांनाही आपल्या बाजूने करून सोलापुरात राष्ट्रवादीला शह देण्याचा शिंदे गटाचा मानस आहे.
कोण आहेत रश्मी बागल?
रश्मी बागल या दिवंगत माजी सहकार राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांच्या कन्या आहेत. दिगंबरराव बागल हे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर रश्मी बागल यांच्या आई शामल बागल यांना राष्ट्रवादीनं आमदार केले. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. परंतु २५७ मतांनी त्यांचा पराभव झाला. रश्मी बागल या सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिकादेखील आहेत. २०१९ मध्ये रश्मी बागल यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी करमाळ्यातून बागल यांना उमेदवारी मिळावी यासाठी तानाजी सावंत आग्रही होते. त्यामुळे बागल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर नारायण पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात पाटील-बागल यांच्या मतविभाजनाचा फायदा संजय शिंदे यांना झाला.