उद्धव ठाकरेंचे हेलिकॉप्टरही तापले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:18 AM2018-04-26T01:18:09+5:302018-04-26T01:18:09+5:30
बुधवारी नगरचे तापमान ३९ अंशावर होते. हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते.
अहमदनगर : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर चांगलेच तापले असताना त्यांचे हेलिकॉप्टरही उन्हामुळे तापल्याने त्यांना कारने मुंबई परतावे लागले. नगर येथे बुधवारी हा प्रकार घडला.
केडगाव येथे दुहेरी हत्याकांडात मयत झालेले शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ठाकरे बुधवारी हेलिकॉप्टरने नगरला आले होते़ सकाळी ११ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले़ त्यानंतर ठाकरे कारने केडगावला गेले़ केडगाव येथून आल्यानंतर त्यांनी नगर शहरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला़ दुपारी २ वाजता ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार होते़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये ठाकरे बसले. मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले़ १५ मिनिटे प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर दुरुस्त झाले नाही़ बुधवारी नगरचे तापमान ३९ अंशावर होते. हेलिकॉप्टर उन्हात असल्याने तापले होते. त्यामुळेच कुलिंग सिस्टिमध्ये बिघाड झाल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. दुरुस्ती होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे हे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कारमधून पुण्याकडे रवाना झाले़
हेलिकॉप्टरचा बिघाड नित्याचाच!
राज्यातील नेत्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने, ती चिंतेची बाब बनली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये चार वेळा तांत्रिक बिघाड झालेला आहे. निलंगा आणि अलिबाग येथे तर ते बालंबाल बचावले आहेत.