उद्धव ठाकरे यांची ‘लेना बँक’; मुख्यमंत्र्यांची टीका
By admin | Published: February 19, 2017 03:16 AM2017-02-19T03:16:53+5:302017-02-19T03:16:53+5:30
भाजपाच्या बॅँकेत मतदान रूपी ठेव ठेवा आणि पाच वर्षांत विकासाचा सव्याज परतावा घ्या, असे आवाहन करत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची लेना बँक आहे. तेथे फक्त लेना
नाशिक : भाजपाच्या बॅँकेत मतदान रूपी ठेव ठेवा आणि पाच वर्षांत विकासाचा सव्याज परतावा घ्या, असे आवाहन करत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची लेना बँक आहे. तेथे फक्त लेना आहे देना नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील सभेत केली.
राज ठाकरे यांचा समाचार घेताना त्यांना आता नकलाच कराव्या लागतील. राज ठाकरे यांच्या बँकेचे हेड आॅफिस कृष्णकुंज आहे, त्यांची बाकी कुठेही शाखा नाही. राष्ट्रवादीची एक बँक आहे, परंतु सध्या ती बंद आहे, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे, कर्जमुक्ती योग्य वेळी मिळेलच, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ग्रामीण भागात किती सभा घेतल्या, असा सवाल त्यांनी केला.
मनसेने पाच वर्षांत नाशिकचा विकास केल्याच्या दाव्यावर बोलताना त्यांनी राज्य सरकारने २२०० कोटी रुपये दिल्यानेच नाशिकचा विकास झाला. बॉटनीकल उद्यानाचा रतन टाटा यांनी विकास केला, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते, त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाशिक दत्तक घेतो, पाच वर्षांत या शहराचा विकास केला नाही, तर पुन्हा तोंड दाखवणार नाही, असा शब्द देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी नागपूरचा असलो, तरी ते शहर सांभाळण्यासाठी नितीन गडकरी समर्थ आहेत, असे ते म्हणाले.