"उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ...."; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 11:47 AM2023-03-26T11:47:39+5:302023-03-26T11:48:07+5:30
या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झालीय हे जाहीर करावे असं राऊत म्हणाले.
मालेगाव - राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्याविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षातील प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे मालेगावच्या आजच्या सभेत उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले की, या मालेगावच्या सभेला सर्व जातीधर्मातील लोक येतील. हे संमिश्र असे शहर आहे. प्रत्येकाने या सभेला यावे. हा देश सगळ्यांचा आहे. या देशाची अखंडता, एकता कायम राहावी यासाठी शिवसेनेने सदैव प्रयत्न केलेला आहे. मालेगावच्या सभेला भाड्याने लोक येणार नाहीत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या हुकुमशाहीविरोधात प्रत्येक विरोधी पक्षाने ठोस भूमिका घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झालीय हे जाहीर करावे. राजघाट हे शांतताप्रिय आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींच्या समाधीस्थळावरून या देशातील हुकुमशाहीविरोधात अनेक आंदोलन झाले. राजघाट हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी स्थान आहे. तिथे विरोधकांना जाऊ दिले नसेल तर या देशाचे भवितव्य कठीण आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, या देशात पक्षांतर करणारे १६ आमदार अपात्र ठरत नाहीत. या देशात निवडणूक आयोग बेईमानांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देते. पण राहुल गांधींना २४ तासांत अपात्र केले जाते. देशात २ वेगवेगळे कायदे आहे. भाजपा-बेईमानांसाठी वेगळा कायदा आणि आमच्यासारख्या लोकांसाठी वेगळा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपात्र ठरवल्याशिवाय राहणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला.
उर्दुवर देशात बंदी आहे का?
उर्दू या देशाची भाषा नाही का? देशात उर्दूवर बंदी आहे का? कालच कुणीतरी जावेद अख्तरांचे कौतुक केले, आम्हीही केले. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी भाषा ही सुद्धा उर्दू आहे. ज्या जावेद अख्तर, गुलजार यांचे कौतुक करते ते आजही त्यांचे लिखाण उर्दूमध्ये करतात. हा जो काही प्रकार सुरू आहे तो लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर फाटलीय असं सांगत संजय राऊतांनी मालेगावमध्ये उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सचे समर्थन केले.