उद्धव ठाकरे गैरसमज हाेण्यास सोबतची माणसेच कारणीभूत, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 11:43 AM2023-01-03T11:43:36+5:302023-01-03T11:44:07+5:30
केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे.
मुंबई : नागपूर विधानभवनातील उपाध्यक्षांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि माझे जे संभाषण झाले, ते मुळात मीडियात लीक झाले. झाले ते झाले, पण जे लीक झाले, तेही अर्धसत्य होते. त्यांच्या सोबतच्या माणसांकडूनच हे प्रसारमाध्यमांकडे पोहोचले. सोबतचीच माणसे गैरसमज करून देत आहेत. योग्य वेळ येताच, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा मी करणार, असे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे. अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीविषयी सांगताना ते म्हणाले, आमच्यात जे बोलणे झाले, ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसांनी मीडियाला सांगितले. कारण तिथे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्या घटनात्मक पदावर असल्याने त्या असे बाहेर बोलू शकत नाहीत.
अब्दुल सत्तार यांचे विधान चुकीचे
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षांतर्गत त्यांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे, ते चुकीचेच आहे. त्यांनी पक्षाच्या पातळीवर आधी मांडायला पाहिजे होते, असेही केसरकर म्हणाले.
सरकारही राहणार नाही, गटही टिकणार नाही : राऊत
मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे व शिंदे गट पुन्हा एकत्र येतील, असे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सरकारही राहणार नाही आणि
गटही टिकणार नाही’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटात आणखी काही गट निर्माण झाले असून, त्यांच्यात टोळीयुद्ध
सुरू आहे, हेच केसरकरांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.