उद्धव ठाकरेंना नाक कुठे शिल्लक? - राणे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:14 AM2017-12-09T05:14:05+5:302017-12-09T05:14:31+5:30
गेली तीन वर्षे सत्तेपुढे घासून-घासून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकच शिल्लक राहिले नसल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली.
कोल्हापूर/कणकवली : गेली तीन वर्षे सत्तेपुढे घासून-घासून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना नाकच शिल्लक राहिले नसल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केली. राज्यातील सरकारबद्दल सामान्य जनतेत नाराजी असेल तर माझा पक्ष जनतेसोबत राहील, असेही त्यांनी सांगून टाकले.
पक्षस्थापनेनंतर राणे प्रथमच राज्याच्या दौºयावर आहेत. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा कोल्हापुरातून सुरू झाला. शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आपला पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले.
पक्षाशी पटत नसल्याने खासदार नाना पटोले यांनी भाजपाचा राजीनामा दिला आहे, त्यापासून शिवसेना काही बोध घेणार का, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, ‘ठाकरे यांच्यात ती हिंमत नाही; कारण तसे केले तर त्यांचे दुकान बंद होईल. सत्तेत राहायचे आणि पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांवर टीका करायची.
आता केवळ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरच ते टीका करायचे तेवढे राहिले आहेत. इतके नाराज आहातच तर सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा सवाल राणे यांनी केला.
केवळ सिंधुदुर्गच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र माझा बालेकिल्ला आहे, असा दावा करून राणे म्हणाले, सध्या माझ्या पक्षात जो येईल, त्याला घेण्याचे धोरण नाही. मग माझ्या आणि इतर पक्षांत काय फरक राहिला? सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर मी टीका करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, मी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेबांवर कधी टीका केली नाही. गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्या सभेला प्रतिसाद मिळत आहे, त्यांची लोकप्रियता वाढत आहे, हे खरे असले तरी गुजरात विधानसभेच्या निकालापर्यंत धीर धरा. निकाल काय लागतो ते पाहू, असे राणे यांनी सांगितले़ राणे यांच्या टीकेला उद्धव काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
आता पक्षात घेऊन आमदार नितेश यांची कारकिर्द मी संपविणार नाही. अजून निवडणुकीस दोन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना माझी दोन्ही मुले माझ्या पक्षात सक्रिय होतील. भाजपासोबत जाताना ‘गिव्ह अॅण्ड टेक’ हा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे माझा मंत्रिमंडळात समावेश होईल; परंतु त्यासाठी काही अवधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राणेंच्या रक्तातच गद्दारी
नारायण राणे यांच्या रक्तातच गद्दारी व लाचारी असल्यामुळे त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भवितव्य नाही. स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरताच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. गेली २५ वर्षे नारायण राणे यांना आपण ओळखतो. त्यांच्या रक्तात गद्दारी व लाचारी असल्याचे गेल्या वर्षभरातील घटनांवरून दिसून येते. राणेंइतकी लाचारी दुसºया कोणत्याही नेत्यामध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला.
‘मंत्रिमंडळात दादागिरी केल्यानेच मराठा आरक्षण’
कोल्हापूर : मराठा आरक्षण देताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक ९६ कुळी मराठा मंत्र्यांनी तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही. मात्र, दादागिरी करून मी हा आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडले. याही पुढच्या काळात मराठा, धनगर आरक्षण देण्याची धमक केवळ या राणेमध्ये आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केले. ‘शिवसेनेला पुरून उरू,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोल्हापूर येथील ऐतिहासिक दसरा चौक मैदानात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या पहिल्याच जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. नव्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा आणि हिरवा हे तीन रंग आणि मध्यभागी वज्रमूठ आहे. माजी खासदार निलेश राणे यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, शिवसेनेत ३९ वर्षे काढली, काँग्रेसमध्ये १२ वर्षे काढली. दोन्हीकडे निष्ठेने काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी जे जे सांगितले ते ते जीवाची पर्वा न करता केले. त्यांना अजूनही दैवत मानतो. मात्र, माझ्याविरोधात उद्धवने कुभांड रचलेल्या १९ घटना मी बाळासाहेबांना लेखी दिल्या होत्या.