युती सरकारचा रिमोट उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे दिलाय - मुख्यमंत्री फडणवीस
By admin | Published: January 23, 2016 01:28 PM2016-01-23T13:28:25+5:302016-01-23T13:30:27+5:30
शिवसेनेचा रिमोट उद्धव ठाकरेंना मिळाला असला तरी मुख्यमंत्री या नात्याने सत्तेची जबाबदारी माझ्याकडे असल्याने उद्धव यांनी सरकारचा रिमोट माझ्याकडे दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा रिमोट उद्धव ठाकरेंकडे दिला असला तरी मुख्यमंत्री या नात्याने सत्तेची जबाबदारी माझ्याकडे असल्याने उद्धव यांनी सरकारचा रिमोट माझ्या हातात दिला आहे. ही गोष्ट इतरांनी समजून घेतली पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना समज दिली. राज्यातील सत्ताधारी शिवसेना- भाजपामधील कुरबूरी, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न कोणालाही नवीन नाहीत, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही हेच कुरघोडीचे राजकारण दिसून आले.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटी व परिवहन विभागातर्फे आज मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सहा नव्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सूचक विधाने करत एकमेकांना टोले हाणले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन रिमोटद्वारे केले. उद्धव ठाकरे तोच धागा पकडत या रिमोटमुळे बाळासाहेबांची आठवण झाल्याचे नमूद केले. ' तेही रिमोट कंट्रोलने सगळ्यांवर नियंत्रण ठेवत असत' सांगत त्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सूचकपणे टोलेबाजी करत बाळासाहेबांनी जरी उद्धवना रिमोट दिला असला तरी मुख्यमंत्री या नात्याने तो आपल्याकडे आल्याचे सांगत शिवसेनेचे मंत्र्यांनाही चांगलीच समज दिली. तसेच कोणाच्या मनात काहीही असो शिवशाहीची सत्ता राज्यात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करत दोन्ही पक्षांतील कुरबुरींचा राज्यातील सरकारवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना-भाजपात कुरबूरी असून वेगवेगळी निवडणुक लढल्यानंतर सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. मात्र युतीचे सरकार असतानाही आपल्याला डावलले जात असल्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची तक्रार असून त्यावरून दोन्ही पक्षांत अनेक वेळा खटके उडताना दिसले आहेत.