"उद्धव ठाकरेंचा राजीनामा म्हणजे नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती’’, भाजपाचा बोचरा वार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:00 PM2023-05-12T12:00:17+5:302023-05-12T12:01:08+5:30
Uddhav Thackeray: मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. त्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर घडलेल्या घडामोडी, सत्तांतर यादरम्यानची राज्यपालांची भूमिका, शिंदे गटाकडून करण्यात येणारे दावे, यावर ताशेरे ओढले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तेव्हा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुन्हा आणता आलं असतं, अशीही टिप्पणी केली. त्यावर मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता. आता शिंदे आणि फडणवीस यांनीही नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे नैतिकतेला जागून राजीनामा दिला असं म्हणतात, मात्र ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती, असा टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेल्या दाव्यांबाबत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आता उद्धव ठाकरे एकीकडे न्याय मेला नाही आहे, असं म्हणतात. तर दुसरीकडे महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे असंही म्हणताहेत. त्यांना नक्की काय म्हणायचं आहे? उद्धव ठाकरे आपण नैतिकतेला जागून राजीनामा दिला म्हणतात. ती नैतिकता नव्हती तर असंगाशी संग केल्याने आलेली अगतिकता होती.तुम्ही राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वोच्च ठेऊन मुख्यमंत्री झालात. किमान सरकार तर धीटपणे चालवायचं होतं. विचारधारा सोडली, पक्षातले साथीदार सोडून गेले, तरी नाही समजलं एवढा अहंकार मोठा कसा झाला ?, अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाने कोणालाही फोडून कोणाच्याही दावणीला बांधलं नाही आहे. दावणीला बांधणं काय असतं, हे अडीच वर्षात मविआ काळात सगळ्या जनतेनं बघितलं आहे. जनतेचा विश्वासघात करून सत्तेसाठी विरोधी विचारधारेच्या पक्षासोबत जाणं, म्हणजे दावणीला बांधणं असतं. वेळ गेली असली, तरी अजूनही विचार करा, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.