बाळासाहेबांच्या अटकेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:56 AM2018-02-23T06:56:54+5:302018-02-23T06:57:19+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शरद पवारांनी मोठी आपुलकी आणि आदर व्यक्त केला असला, तरी..
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी शरद पवारांनी मोठी आपुलकी आणि आदर व्यक्त केला असला, तरी वयाच्या ७० व्या वर्षी बाळासाहेबांच्या अटकेचा प्रयत्न केला, तेव्हा ही आपुलकी कुठे गेली होती, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला.
पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पुण्यात घेतलेली पवार यांची मुलाखत आपण चोरूनदेखील पाहिलेली नाही. पण पवारांनी केलेली काही वक्तव्ये माझ्यापर्यंत आली आहेत. पवार आज आर्थिक आधारावर आरक्षणाची वकिली करीत असले तरी हीच भूमिका शिवसेनाप्रमुखांनी सुरुवातीपासून घेतली होती. मात्र तेव्हा ते काहींना पटले नाही.
शरद पवारांनी तर मंडल आयोगाचे
भूत निर्माण केले. शिवसेना फोडण्याचाही काही लोकांनी प्रयत्न केला; मात्र
शिवसेना आज कुठे आहे आणि
फोडणारे कुठे आहेत, असा सवाल उद्धव यांनी केला.
आर्थिक निकषावर आरक्षण द्या, ही बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली गेली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच तोंडावर टीका केली. त्यांनी कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.