उद्धव ठाकरेंचे विधान शरद पवारांनी खोडले; महिनाभरापूर्वी स्वत:च वर्तवलेली शक्यता फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 08:49 AM2023-02-25T08:49:08+5:302023-02-25T08:50:47+5:30
उद्धव ठाकरे यांनी कशाच्या आधारे वक्तव्य केले, हे मी जाणून घेतलेले नाही असं शरद पवार म्हणाले.
मुंबई - शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कसबा, चिंचवड निवडणूक प्रचाराच्या भाषणादरम्यान मध्यावधी निवडणुका लागतील, अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीच मध्यावधीची शक्यता व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यावधी निवडणुका लागतील, असे मला वाटत नाही, सध्या तरी तशी स्थिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मध्यावधी निवडणुकीवर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी कशाच्या आधारे वक्तव्य केले, हे मी जाणून घेतलेले नाही; पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील, असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असे वाटत नाही, असे ते म्हणाले.
मला काय म्हातारा समजता का?
विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. ‘आपण रात्री ११ वाजता आम्हाला भेटलात. या वयातही आपण तब्बल ४० मिनिटे उभे होतात. आमच्या व्यथा जाणून घेतल्या. आपण एकमेव होतात ज्यांनी फक्त आमच्यासाठी वेळ दिलात. अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यावर पवार यांनी माझी तुम्हा सगळ्यांकडे एक तक्रार आहे. या वयातही, असे पुन: पुन्हा म्हणता. आपण मला काय म्हातारा समजता का, अशी मिश्कील टिपणी केली.
शपथविधीवर मजेत बोललो
राष्ट्रपती राजवट हटली, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. फडणवीस यांनी माहिती द्यावी. त्याला मी इतके महत्त्व देत नाही, असे ते म्हणाले.