विकासकामांना स्थगिती देण्याच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचे भाजपाला जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 07:26 PM2019-12-15T19:26:52+5:302019-12-15T19:27:28+5:30
आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. पण....
नागपूर - उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांना स्थगिती देण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथून प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र किती प्रकल्पांना स्थगिती दिली ते तर सांगा. मुंबईतील आरे मेट्रो कारशेड वगळता कुठल्याही प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. विकासकामांना स्थगिती दिल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या सरकारवर स्थगिती सरकार म्हणून ठपका ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. पण आम्ही किती विकासकामांना स्थगिती दिली हे तर सांगा ? आरे मेट्रो कारशेड वगळता राज्यातील एकही प्रकल्प स्थगित केलेला नाही. आरेमधील जैवविविधतेबाबत बरीच माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी ही स्थगिती देण्यात आलेली आहे.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
"मुंबईमध्ये कोणत्याही विकासकामांना किंबहुना राज्यातल्या कोणत्याही विकासकामाला आम्ही स्थगिती दिलेली नाही फक्त आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे."
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 15, 2019
-मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/wXKgsAXmkJ
तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्दव ठाकरे यांनी राज्याच्या उपराजधानीतून कारकीर्दीला सुरुवात होतेय याचा आनंद असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्याला कर्जमुक्त नव्हे तर चिंतामुक्त करण्याची आमची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवस्मारकाबाबत विचारणा केली असता, ''छत्रपतींच्या स्मारकात घोटाळा केला असेल तर तो निंदाजनक प्रकार आहे. याची चौकशी करून जे कुणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करू. तसेच राज्याला आणि देशाला अभिमान वाटेल असे स्मारक बनवू , असे अश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.
''स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरही आमची भूमिका स्पष्ट आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण गोंधळ उडवा, तणावाखाली ठेवा, देशभरात परिस्थती हाताबाहेर गेल्यानंतर स्वतःला काहीच करता येत नसेल तर देशात गोंधळ उडवा, लोकांना सतत तणावाखाली ठेवा आणि आपला कारभार आटपून घ्या अशी भाजपाची निती देशभरात ठरली की काय अशी मला शंका येते, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.