जेवणाच्या ताटावर मोदी काढणार उद्धव ठाकरेंची समजूत
By Admin | Published: March 25, 2017 02:09 PM2017-03-25T14:09:59+5:302017-03-25T15:17:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले असून यानिमित्ताने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - सत्तेत असूनही वारंवार विरोधकांची भूमिका निभावणा-या शिवसेनेची समजूत काढण्यासाठी आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले असून यानिमित्ताने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. जेवणाच्या ताटावर समेट घडवून आणण्याचा मोदींकडून होणारा हा प्रयत्न कितपत यशस्वी ठरतो हे येणा-या दिवसांमध्ये कळेलच.
राज्यातही शिवसेना आणि भाजपामधील तणाव वाढत असून आपल्यातील हा दुरावा कमी करण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. 28 मार्चला म्हणजेच गुढीपाडव्याला भाजपाचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सत्तेत असून नेहमी भांडणा-या शिवसेना - भाजपामधील तणाव कितीही प्रयत्न तरी कमी होताना दिसत नाही आहे. याउलट रोज नव्या मुद्यांवर सत्तेतील हे दोघे भाऊ भांडताना दिसत आहेत. भाजपाला कोंडीत पकडण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसून वारंवार सरकारला अडचणीत आणत आहे.
राज्यात एकीकडे गुढीपाडव्याला भाजपाचे मंत्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार असताना तिकडे मोदींनी गुढीपाडव्यानंतर एनडीएतील घटक पक्षांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं आहे. या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलं जाणार आहे. स्नेहभोजनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्धव ठाकरेंशी चर्चा करतील. यावेळी पंतप्रधान नोदी वाद कमी करण्याच्या दृष्टीने तसंच आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडीबाबत शिवसेनेची भूमिका याबाबत चर्चा करणार असल्याचे सुत्रांनी सांगितलं.
राज्यातही मनधरणी -
सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून सातत्याने घेण्यात येत असलेली आडमुठी भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांकडून झालेली कोंडी या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात सरकार टिकवण्यासाठी नव्या समिकरणांची चाचपणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत होती. त्यासाठी इतर पक्षातील आमदारांना आपल्या पक्षात घेणे किंवा थेट मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे, या पर्यायांची गुरुवारी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली.
राजकीय समीकरणं पाहता भाजपा शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 28 मार्चला भाजपाकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. युतीतील ताणलेले संबंध निवळावे यावर चर्चा करण्यासाठी हो दोन्ही नेते मातोश्रीवर जाणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
शिवसेनेकडून सरकारला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज आहेत. दरम्यान, गुरुवारी झालेल्या भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यावधी निवडणुका आणि भाजपाच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 29 आमदारांना पक्षा प्रवेश देण्याच्या पर्यायावर चर्चा झाली. पण या दोन्ही पर्यायांवर बैठकीत 50-50% मतं पडली त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत.
भाजपाच्या कोअर बैठकीत मध्यावधी निवडणुकांसाठी किती आमदारांची तयारी आहे. तसेच मध्यावधी निवडणुका झाल्यास पक्षाची कामगिरी कशी राहील, याबाबत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांशी सल्लामसलत केली असल्याचं समोर आलं होतं. तसेच संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांरांनी पक्षात प्रवेश देण्याचा पर्याय भाजपासमोर आहे. अशा आमदारांना भाजपाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आणून बहुमताचे गणित सोडवण्याचा भाजपा प्रयत्न करेल असं बोललं जात होतं.