उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; फडणवीस सरकारचे ताळेबंद तपासणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 06:48 PM2019-12-01T18:48:47+5:302019-12-01T18:51:57+5:30
आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोध पक्षनेत्याची निवड करण्यात आली.
मुंबई : विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील टोले-प्रतिटोले रंगलेले असताना ठाकरे यांनी आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्याला आर्थिक मदत मिळविण्यासाठी ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटला जाणार आहेत.
आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोध पक्षनेत्याची निवड करण्यात आली. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
विकासकामांची माहिती मागवणार आहे. त्यावर किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत, कुठे होत आहेत. कामे का अडली आहेत, किती प्रगती झाली आहे. तातडीची कामे कोणती आणि कमी महत्वाची कामे कोणती, याचा लेखाजोखा मी मागविला असल्याचे सांगत फडणवीस सरकारच्या काळातील विकास कामांची श्वेतपत्रिकाच काढणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा तात्पुरता विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून भाजपाचे फडणवीस सरकार गेल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला होता. तसेच राज्यामध्ये पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यातच ठाकरेंनी शेतकऱ्यांना तातडीची 25 हजारांची हेक्टरी मदत करण्याचे आश्वासन निवडणुकीआधी दिले होते. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ही मदत आता तातडीने द्यावी अशी मागणी केली आहे.