नाकाखाली टिच्चून 'मुक्त काश्मीर'चे फलक खपवून घ्याल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 10:47 PM2020-01-06T22:47:01+5:302020-01-06T22:47:45+5:30
जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.
मुंबई : दिल्लीतील जेएनयू हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावरही विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला. मात्र, यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये काश्मीर मुक्त करण्याचे फलक झळकल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या काश्मीर मुक्तीच्या फलकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. या आंदोलनामध्ये आयआयटी बॉम्बे, टाटा इन्स्टीट्यूटसारख्या शैक्षणिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्रीही सहभागी झाल्या होत्या.
'मुक्त काश्मीर'च्या व्हिडिओवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. एएनआयचा व्हिडीओ त्यांनी रिट्विट करत उद्धव ठाकरेंना जाब विचारला आहे. आंदोलन नेमके कशासाठी? काश्मीर मुक्तीची घोषणा कशाला? मुंबईमध्ये अशाप्रकारचे फुटीरतावादी खपवून का घ्यायचे? हे फक्त मुख्यमंत्रू कार्यालयापासून दोन किमीवर घडतेय? उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आळवला जातोय, तो खपवून घेणार का, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
Protest is for what exactly?
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 6, 2020
Why slogans of “Free Kashmir”?
How can we tolerate such separatist elements in Mumbai?
‘Free Kashmir’ slogans by Azadi gang at 2km from CMO?
Uddhav ji are you going to tolerate this Free Kashmir Anti India campaign right under your nose???@OfficeofUThttps://t.co/zkWRjxuTqA
जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी मास्कधारक हल्लेखोरांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच काही जणांची ओळख पटविल्याचे समजत आहे.