‘उद्धव ठाकरे यांनीच माफी मागायला हवी’
By admin | Published: September 29, 2016 02:52 AM2016-09-29T02:52:01+5:302016-09-29T02:52:01+5:30
आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे
ठाणे : आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ठाण्यातील सत्ताधारी पैशांसाठी सैराट झाले आहेत. प्रत्येकटेंडरची रक्कम ‘मातोश्री’वर जाते. त्यामुळेच त्यांना इथले नेते प्रिय झाले आहेत, असा आरोपही राणे यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात केला.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा एखादा जरी हल्ला झाला, तरी ते पंतप्रधानांची चेष्टा करत असत. आता ते पंतप्रधान असताना, त्यांचे हात आणि तोंड कोणी पकडले आहेत? आता ते का गोळ्या चालवत
नाहीत, असा प्रश्नही त्यांनी
विचारला. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाला महासत्तेचा मार्ग दाखवला. पण मोदी देशाच्या जवानांना शहीद होण्याचा मार्ग दाखवत आहेत, अशी टीका करत त्यांनी मोदींना टार्गेट केले. राज्यातील सरकार हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे विकास ठप्प आहे. म्हणून जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपची लाट किनाऱ्यावर फुटली आहे. आता काँग्रेसची लाट उसळत असल्याने कामाला लागा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)
मराठा आरक्षणासाठी पूर्ण अहवाल मांडा!
मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष असताना भाजपचे तावडे यांनी निवेदन दिले, पण शिवसेनेचे एकही निवेदन आले नव्हते. आरक्षणाबाबत राणे समितीचा पूर्ण अहवाल सरकारने न्यायालयापुढे सादर केला नाही. अहवालातील सर्व मुद्दे आता तरी न्यायालयात सादर करावेत आणि चांगला वकील द्यावा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.