उद्धव विरुद्ध देवेंद्र राज्यभर घमासान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 04:32 AM2017-01-28T04:32:20+5:302017-01-28T04:32:20+5:30

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत

Uddhav versus Devendra state proud! | उद्धव विरुद्ध देवेंद्र राज्यभर घमासान!

उद्धव विरुद्ध देवेंद्र राज्यभर घमासान!

Next

यदु जोशी / मुंबई
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी निवडणूक युती तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव विरुद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे.
संयमी, पण राजकीय लढाईत आक्रमकपणा दाखविणारे उद्धव व देवेंद्र यांचे ‘ट्युनिंग’ कालपर्यंत चांगले होते. मात्र, युती तुटल्याने ‘वर्षा’ व ‘मातोश्री’ दरम्यानची हॉटलाइन बंद पडली असून हे दोघे एकमेकांविरुद्ध दंड थोपटताना दिसतील. फडणवीस यांनीही मुंबईसह राज्यात परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करून शिवसेनेचे आव्हान स्वीकारले आहे. हिंदुत्वाच्या विचारधारांमधील हा
मुकाबला असेल. मुंबईवर वर्चस्व
कोणाचे याचा फैसला यानिमित्ताने होणार असल्याने दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
युती तुटल्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी घेण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. विशेषत: राज्यभर स्वत:ची व्होट बँक असलेली काँग्रेस या परिस्थितीचा फायदा घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. पण गेली दोन वर्षे आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या राष्ट्रवादीला कितपत फायदा उठवता येईल, हा प्रश्न आहे. मात्र जिल्हा परिषदांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे, हेही तितकेच महत्त्वाचे.
जबड्यात घालुनी हात...
‘जबड्यात घालुनी हात, मोजतो दात, जात ही आमुची,’ असे ठणकावून सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला चुचकारले होते. आता त्यांचे (भाजपाचे) दात पाडायचेच काम मी करून दाखवतो, असा दणका उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
मुंबईत परिवर्तन - मुख्यमंत्री : जे येतील त्यांच्यासोबत, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय. पण परिवर्तन तर होणारच, असे टिष्ट्वट करीत फडणवीस म्हणाले, सत्ता हे साध्य नाही तर ते विकासाचे साधन आहे. पारदर्शी कारभार हा आमचा मूलमंत्र आहे.
पवारांना दु:ख : ‘युती तुटल्याचं अतीव दु:ख आहे,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर ते उत्तरले, मी जर तरच्या प्रश्नांना उत्तर देत नाही. त्यांनी (भाजपा) काय तो निर्णय घ्यावा आणि मग चर्चेला यावं.
...तर मनसेचा फायदा झाला असता
युती झाली असती तर मुंबईत दोन्ही पक्षांचे बंडखोर मनसेच्या गळाला लागले असते आणि त्याचा फायदा मनसेला झाला असता. मात्र ती न झाल्याने राज ठाकरे यांना २०१२ च्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागेल.
सत्तेत मात्र कायम : युती तुटली असली तरी राज्य सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार नाही, आम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचा नाही, असे खा. संजय राऊत म्हणाले.

Web Title: Uddhav versus Devendra state proud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.