उद्धव यांनी साधला कसाबसा नंबर १

By admin | Published: February 24, 2017 05:36 AM2017-02-24T05:36:16+5:302017-02-24T05:36:16+5:30

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जे बोलतो ते करून दाखवितो’ असे आत्मविश्वासाने सांगत मते मागितली आणि मुंबईकरांनी

Uddhav's | उद्धव यांनी साधला कसाबसा नंबर १

उद्धव यांनी साधला कसाबसा नंबर १

Next

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘जे बोलतो ते करून दाखवितो’ असे आत्मविश्वासाने सांगत मते मागितली आणि मुंबईकरांनी शिवसेनेला निकालात कसेबसे नंबर एकवर ठेवले असले तरी स्वबळावर सत्ता मिळविण्यात अपयश आले.
‘अभी नही तो कभी नही’, अशी या निवडणुकीत शिवसेनेची परिस्थिती होती.मुंबई महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणणे या पक्षासाठी जीवनमरणाचा प्रश्न होता. मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपाशी दोन हात करायचे होते. अशावेळी निष्ठावान शिवसैनिकांच्या बळावर उद्धव यांनी मुंबई पिंजून काढली. जुन्यानव्या शिवसैनिकांमध्ये जोश भरला आणि ८४ जागांवर मोहोर उमटवली. शिवसेनेच्या जागा गेल्यावेळपेक्षा नऊनेच वाढल्या. मनसेच्या जागा वीसने कमी झाल्या. त्या शिवसेनेला मिळतील हा होरा मात्र चुकला. तसे झाले असते तर शिवसेना शंभरच्या घरात दिसली असती.
तब्येतीच्या मर्यादांवर मात करीत उद्धव यांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती प्रचार केला आणि भाजपाच्या लाटेतही शिवसेनेला ६३ जागा राज्यात मिळवून दाखविल्या होत्या. मात्र मुंबईत शिवसेनेला १४ तर भाजपाला १५ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासूनच भाजपाला स्वबळाची खुमखुमी होती.
महापालिकेची निवडणूक उद्धव यांनी पूर्णत: स्वत:च्या अंगावर घेतली. शिवसेनेच्या अनेक शाखांना त्यांनी भेटी दिल्या. मुंबईतील पक्षसंघटनेचा आत्मा असलेले विभागप्रमुख, पदाधिकारी यांच्याशी वैयक्तिक संपर्क राखला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतील भाजपाच्या सर्वच बड्या नेत्यांनी पारदर्शकतेचा मुद्दा समोर करीत थेट मातोश्रीपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करीत उद्धव यांना घेरले. त्यांनीही मग खास ठाकरी शैलीमध्ये पलटवार केला. त्यातून झालेले वाक्युद्ध संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. मुंबई आणि मुंबईकरांच्या अस्मितेला शिवसेनेने पूर्वीपासूनच हात घातला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी टाळी दिली होती पण उद्धव यांनी ती अव्हेरली.
उद्धव यांच्या नेतृत्वात शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या हे त्यांचेच यश आहे पण, ते आपल्या पक्षाला आणखी दहाबारा जागा मिळवून सत्तेप्रत नेऊ शकले नाहीत यातच त्यांच्या मर्यादाही अधोरेखित झाल्या आहेत. उद्धव विरुद्ध देवेंद्र या लढाईत कोण जिंकले या प्रश्नाचे उत्तर महापौरपद कोणाकडे जाते यातच दडलेले आहे.

मुंबईवर लक्ष
उद्धव यांच्यासाठी मुंबई अत्यंत महत्त्वाची असल्याने ते याच ठिकाणी अडकून पडले. नाशिक, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांची एकेकच सभा झाली. नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता वा मंत्री फिरला नाही तरी चांगले यश मिळाले होते. यावेळी काही मंत्री थोडेफार फिरले तरी जे काही यश मिळाले ते निष्ठावान शिवसैनिकांचेच आहे. नव्या पिढीसमोर युथ आयकॉन म्हणून आदित्य ठाकरे यांना शिवसेनेने जाणीवपूर्वक समोर केले पण त्या बाबतीत मुंबईकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती दिली.

Web Title: Uddhav's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.