उद्धव यांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Published: April 26, 2016 06:20 AM2016-04-26T06:20:14+5:302016-04-26T06:20:14+5:30
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ७ मे रोजी कल्याण-डोंबिवली येथे महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ७ मे रोजी कल्याण-डोंबिवली येथे महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: उद्धव या अभियानात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून भाजपाबरोबर शिवसेनेची खडाखडी झाली नाही, असा एकही दिवस गेलेला नाही. महापालिकेत सध्या युतीची सत्ता असली तरी येत्या मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांत उभय पक्षांतील संघर्ष तीव्र होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या शक्तिप्रदर्शनाकडे पाहिले जात आहे.
उपक्रम यशस्वी होण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात बैठक घेतली. त्या बैठकीला विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले होते. सर्व शिवसेना नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक संस्था आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले होते. यानिमित्ताने दोन्ही शहरांमधील काही प्रभागांमध्ये घंटागाड्यांचे वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)