उद्धवसेनेचे अनिल परब आहेत ३० कोटींचे धनी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:30 AM2024-06-04T08:30:36+5:302024-06-04T08:30:48+5:30
परब यांच्याकडे १७ कोटी ९८ लाख १३ हजार, तर पत्नीकडे १ कोटी ६३ लाख ४० हजारांची जंगम मालमत्ता आहे.
नवी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी उद्धवसेनेचे अनिल परब यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूण संपत्ती ३० कोटी रुपये असल्याचे विवरण त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिले आहे. त्यांच्याकडे २ लाख ८१ हजार ७४२ रुपयांची, तर पत्नी सुनीता परब यांच्याकडे १ लाख ४२ हजारांची रोकड आहे.
परब यांच्याकडे १७ कोटी ९८ लाख १३ हजार, तर पत्नीकडे १ कोटी ६३ लाख ४० हजारांची जंगम मालमत्ता आहे. परब यांच्याकडे ९ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांची आणि पत्नीकडे २ कोटी ४८ लाख पाच हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दोन चारचाकी गाड्या आहेत. त्यांची किमत ५० लाख १७ हजार रुपये, तर पत्नी सुनीता परब यांच्याकडेसुद्धा दोन आलिशान गाड्या आहेत. त्यांची किमत ३१ लाख ९५ आहे.
दाेघांकडे जवळपास एक कोटी दहा लाखांचे दागिने आहेत. विविध बँक खाते आणि ठेवीच्या स्वरूपात ८ कोटी २४ लाख २५ हजार रुपये आहेत. कर्जत येथे शेतजमीन, मुंबईच्या विविध भागात दुकाने आणि सदनिका त्यांच्या नावावर आहेत. परब यांच्यावर ४ कोटी ६ लाख ४२ हजार रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ८ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
विविध स्वरूपाचे २४ गुन्हे
अनिल परब यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत विविध स्वरूपाच्या २४ गुन्ह्यांची नोंद आहे.
अनधिकृत बांधकाम, हिंसा, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
यापैकी १४ गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता केली असून, उर्वरित खटले सुरू असल्याचे परब यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.