पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातो; उद्धव ठाकरेंची भाजपवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 05:40 PM2023-07-09T17:40:10+5:302023-07-09T17:40:47+5:30
'पक्ष पळवण्यांना मला एवढंच सांगायचे आहे की, तुम्ही पीक नेऊ शकता मात्र शेती आमच्याकडेच आहे.'
Udhav Thackeray Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकाणार अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. गेल्यावर्षी शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीतही फुट पडली आहे. यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. यानंतर एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली, तर उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. सध्या उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनाने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जातो, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही. पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे. ही परंपरा महाराष्ट्र आणि देशासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर आहोत, असं आम्हाला लोकांकडून सांगितलं जात आहे.
पक्ष पळवण्यांना मला एवढंच सांगायचे आहे की, तुम्ही पीक नेऊ शकता मात्र शेती आमच्याकडेच आहे. जे पीक तुम्ही पळवून नेले, त्याला हमीभाव भेटतो का ते आता पहा. आता अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे, मात्र सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही? भाजप आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. आता त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजार बुंडग्यांचा सांभाळ करावा, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.