‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती..!’

By admin | Published: June 5, 2016 12:30 AM2016-06-05T00:30:50+5:302016-06-05T00:30:50+5:30

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो

'Udonania weight loss sure ..!' | ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती..!’

‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती..!’

Next

- नंदकिशोर पाटील, मुंबई

श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर जि. जळगाव) येथे मंगळवारी संत मुक्ताई मंदिर जीर्णोधार सोहळ्यात नाथाभाऊंनी सर्व सोडून मुक्ताई चरणी येण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी जेव्हा ‘घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविली संती विठोबाची’ या संतोक्तीचा उच्चार केला, तेव्हाच खरे तर ते पायउतार होणार हे निश्चित झाले होते. संकटसमयीच माणूस देवाचा धावा करत असतो. नाथाभाऊंनी तेच केले. चहूबाजूंनी आरोपांच्या फैरी सुटल्यानंतर ते आजवर कमावलेली सर्व ‘माया’ ते मुक्ताई चरणी अर्पण करायला निघाले!
गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या खडसेंनी जळगाव जिल्ह्यात जे पेरले तेच उगवले. सुडाचे राजकारण करत त्यांनी आपल्या विरोधकांना कसे नामोहरण केले, याची अनेक उदहारणे जिल्ह्यात आहेत. सत्तेवर आल्यानंतर अनेकांच्या संपत्तीत वाढ होते, पण विरोधी पक्षात असताना मालामाल झालेले खडसे हे एकमेव उदहारण असेल. खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला १९८९ ते २०१४ पर्यंतचा तपशील बघितला, तर कोणाचेही डोळे विस्फारतील. संत एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लक्ष्मी चतुर्भूज झाली, प्रसाद देऊनिया गेली’ तद्वत लक्ष्मीच्या हव्यासापायी खडसेंना आज पायउतार व्हावे लागले.
पुण्यातील जमिनीचे प्रकरण
समोर आल्यानंतर, त्यांनी ज्या निर्ढावलेपणाने त्याचे खंडण केले ते पाहता, त्यांना स्वत:वर आणि पक्षावर जरा अतीच विश्वास होता, असे वाटते. भोसरी एमआयडीसीतील जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना, परपस्पर संबंधित जमीन मालकाशी सौदा करून कोट्यवधी रुपयांची जमीन स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावे खरेदी केली. वास्तविक, या जमिनीच्या सातबाऱ्यावर एमआयडीसीचा उल्लेख असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी हा
व्यवहार केला. शिवाय, मंत्री म्हणून असलेल्या न्यायिक अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी घेतलेल्या ‘शपथे’चाही भंग केला. मंत्रिपदाची शपथ घेताना ‘मी माझ्या अख्यत्यारितील माहितीचा परोक्ष अथवा अपरोक्ष, स्वत:च्या वा कुटुंबाच्या फायद्यासाठी वापर करणार नाही,’ असे सर्वांसमक्ष जाहीर करावे लागते. खडसेंनी नेमके उलटे कले. हे प्रकरण ‘आॅफिस आॅफ प्रॉफिट’ या प्रकारात मोडते. त्यामुळे इतर आरोप सिद्ध नाही झाले, तरी भोसरीच्या
जमिनीत खडसेंचा पाय खोलवर रुतलेला आहे, हे नक्की. कदाचित, मुख्यमंत्र्यांना याची कल्पना आली असावी, म्हणूनच त्यांनी तातडीने दिल्ली गाठून पक्षश्रेष्ठींच्या कानावर सर्व बाबी घातल्या, अन्यथा एरवी त्यांनी खडसेंची पाठराखण केली असती.
राजकारणातील अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवलेल्या नाथाभाऊ संकटाच्या काळात एकटे पडलेले दिसले. सरकार स्थापन झाल्यानंतर
अवघ्या चार-सहा महिन्यांत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण बाहेर आले, तेव्हा पंकजाच्या बचावासाठी खडसेंच पुढे आले. नंतर विनोद तावडे यांच्यावर आरोप झाले तेव्हाही सुधीर मुनगंटीवर, चंद्रकात पाटील यांना सोबत घेऊन खडसेंनीच पाठराखण केली, पण जेव्हा स्वत: खडसेंवर ही वेळ
आली, तेव्हा त्यांच्या बचावासाठी एकटे रावसाहेब दानवे सोडले, तर कोणीही पुढे आले नाही. यावरून पक्षात आणि मंत्रिमंडळात खडसेंविषयी काय मत आहे, हे दिसून येते. मंत्रिमंडळात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांशी खडसे यांचे खटके उडत असल्याची चर्चा होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय त्यांनी परपस्पर जाहीर केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण ‘ज्येष्ठ’त्त्वाच्या जोरावर खडसे कोणालाच जुमानायला तयार नव्हते. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या खडसेंना डावलून राज्यमंत्री पदाचाही अनुभव नसलेल्या देवेंद्र फडणवीस यांना मोदी-शहा यांनी मुख्यमंत्री पदी बसविले, तेव्हाच खरे तर खडसेंनी बदललेल्या वाऱ्याची दिशा ओळखायला हवी
होती. महसूल, कृषीसह ११ खात्यांचा पदभार आल्यानंतर ऐटीत आलेल्या नाथाभाऊंना राजकारणातील या त्सुनामीचा अंदाजच आला नाही.
पर्ससन जाळ्यातून मच्छीमारांची सुटका करताना, स्वत: तेच अलगद जाळ्यात अडकले!

राजीनामा देताना खडसे यांनी मोठा नैतिकतेचा आव आणला असला, तरी सहजासहजी मंत्रिपद सोडणाऱ्यांपैकी ते नाहीत. तसे असते तर आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी लालदिव्याची गाडी सरकारजमा केली असती, पण गेले दहा दिवस त्यांनी मंत्रिपद वाचविण्यासाठी सर्व आयुधे वापरली. ज्येष्ठतेचा आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय ताकदीचा धाक दाखवून पाहिला, पण पक्षाच्या दृष्टीने आजवर ‘असेट’ असलेले खडसे या प्रकरणांमुळे एकदम ‘लायबिलेटी’ बनल्यामुळे अखेर त्यांच्या गळ्यात घंटा बाधण्याचा निर्णय घेण्याशिवाय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नव्हता.

Web Title: 'Udonania weight loss sure ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.